लोकमत न्यूज नेटवर्क
फैजपूर, ता. यावल : शहरातील श्रीकृष्ण कॉलनी भागातील रहिवाशांनी बुधवारी दुपारी बाराला पालिकेत गटारीचे घाण पाणी आणून पालिकेत फेकून अनोखे आंदोलन केले.
श्रीकृष्ण कॉलनीतील रहिवाशांनी पालिकेत गटारीचे पाणी आणून फेकले. गेल्या सहा वर्षांपासून या भागात सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने घाण पाणी बाहेर डबक्यात साचत आहे.
या भागात गटारींची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक प्रकारची निवेदन पालिका प्रशासन यांना दिली आहेत; मात्र या प्रकरणावर कोणतीही कारवाई पालिकेकडून आतापर्यंत करण्यात आली नाही. रहिवाशांच्या घरातील सांडपाण्याचा निचरा गटारीत होत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पालिकेला वारंवार निवेदन देऊन पालिका जाणीवपूर्वक या भागाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. पालिकेने १५ दिवसांत गटारीचे काम सुरू केले नाही तर पुन्हा यापेक्षा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी नागरिकांनी दिला.