जळगाव - जिल्ह्यातील पाच तालुक्यातील शालेय पोषण आहारातील गैरव्यवहारप्रकरणी शालेय पोषण आहार विभागाशी संबंधित पाच अधीक्षकांच्या (शिक्षण विस्तार अधिकारी) चौकशीचे आदेश जिल्हा परिषद सीईओंनी दिले आहेत. यासाठी नाशिक येथील सहाय्यक आयुक्तांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.सीईओंनी गुरुवार २४ रोजी हे आदेश काढले आहेत. या प्रकरणात एस.पी. विभांडीक (चाळीसगाव), एस.एस. पाटील (पाचोरा), व्ही.आर. कुमावत (भडगाव), व्ही.एस. धनके (बोदवड) आणि ए.पी. बाविस्कर (धरणगाव) या पाच शिक्षण विस्तार अधिका-यांवर ठपका ठेवण्यात आला आहे. शालेय पोषण आहाराचे धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी नेले जात असताना पोलिसांनी ते पकडले होते. तपासात हे धान्य पोषण आहाराचे असल्याचे निष्पन्न झाले. विधानसभा अधिवेशन आणि जिल्हा परिषद सभांमधून हा विषय गाजला होता.
शालेय पोषण आहारातील गैरव्यवहार, पाच अधीक्षकांची चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 19:12 IST