मका पिकाचे उत्पन्न मिळण्याऐवजी जनावरांच्या तोंडात मका पिकाचा हिरवा चारा जात आहे. परिसरात उसाचे पीक जास्त असल्याने रानडुकरे दिवसा उसाच्या पिकात लपून बसतात आणि रात्री पिकांमध्ये वावरत मका, केळी नवतीसह पिकांचे नुकसान करीत आहेत. वन विभागाने तत्काळ पीक नुकसानीचे पंचनामे करावेत. शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, या रानडुकरांचा बंदोबस्त वन विभागाने करावा, अशी मागणी सावदे, दलवाडे, गोंडगाव येथील शेतकरी वर्गातून होताना दिसत आहे.
भडगाव तालुक्यातील सावदे गिरणा काठालगत, सावदे गिरणा पुलालगत केळी, मका पिकांसह इतर पिके हिरवळीने बहरत वाढीच्या अवस्थेत आहेत. शेतकऱ्यांनी पिकांसाठी रात्रं-दिवस मेहनत केली आहे. शेती पिकांवर अमाप खर्च करून शेती पिकांचे वैभव फुलविले आहे. पिके परिपक्व होत असून, चांगल्या उत्पन्नाच्या वाटेवर आहेत. मात्र सध्या गिरणा काठालगत शेतशिवारात रानडुकरांचे कळपच्या कळप फिरत आहेत. रानडुकरांचा हैदोस वाढल्याने शेती पिकांचे अतोनात नुकसान होताना दिसत आहे.
या परिसरात ऊस पिकाचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात असून, रानडुकरांना दिवसा लपण्यास जागा होत आहे. रात्री हे कळप पिकांमध्ये वावरत पिकांचे नुकसान करीत असल्याचे चित्र आहे. राजेंद्र मोतीलाल परदेशी यांनी एक एकर लागवड केलेले मका पीक डुकरांनी जमिनीवर आडवे पाडून अर्धा एकरच्या वर नुकसान केले आहे. मक्याची कणसे खाऊन रानडुकरे नुकसान करताना दिसत आहेत. मका पिकाचा आडवा पडलेला चारा शेतकरी जनावरांना खाऊ घालताना दिसत आहेत.
नवीन लागवड केलेल्या केळी नवती खोडांचेही रानडुकरांचे कळपे मोठे नुकसान करताना दिसत आहेत. यात केळी पिकांचे नुकसान झालेले अनेक शेतकरी आहेत. यात राजेंद्र मोतीलाल परदेशी, भीमसिंग फकिरा परदेशी, विजयसिंग जगनसिंग परदेशी, छायाबाई भीमसिंग परदेशी, रतन हरचंद परदेशी, हिरालाल बालचंद परदेशी, भगवान शिवसिंग परदेशी, शिवाजी नारायण पाटील, संजय नारायण पाटील, जगदीश महेंद्रसिंग राजपूत, संभाजी अरविंद पाटील, भावसिंग हरचंद परदेशी, कैलास हरचंद परदेशी, मोहन हरचंद परदेशी आदी शेतकऱ्यांचा केळी नवती पिकाचे अतोनात नुकसान रानडुकरे करीत आहेत. मंगलाबाई कैलास परदेशी, अनिल कैलास परदेशी यांचे व मच्छिंद्र भिका परदेशी यांचे १ एकर मका पिकाचे नुकसान झाले आहे. यांच्यासह काही शेतकऱ्यांचे केळी नवतीसह इतर पिकांचे नुकसान होताना दिसत आहे. गोंडगाव येथील शेतकरी बाळकृष्ण राजाराम कोतकर यांच्या दलवाडे शिवारातील शेतात अडीच एकर मक्यापैकी १० ते १२ गुंठे मका पिकाचे रानडुकरांच्या कळपांनी नुकसान केले आहे.
मक्याऐवजी जनावरांना हिरवा चारा
रानडुकरांच्या कळपांचा उपद्रव वाढल्याने केळी, मक्यासह इतर पिकांचे नुकसान होताना दिसत आहे. रानडुकरे केळी नवतीचे लागवड केलेले खोड खराब करताना दिसत आहेत. मका पिकाची हिरवी झाडे मका कणसासह जमिनीवर आडवी पाडून नुकसान करीत आहेत. हिरवा मका चारा जमा करून शेतकरी जनावरांसाठी चारा बैलगाडी वा डोक्यावर वाहून जनावरांना खाऊ घालतानाही नजरेस पडत आहेत.
250821\25jal_2_25082021_12.jpg~250821\25jal_3_25082021_12.jpg
सावदे शिवारात मका पिकाचे केलेले नुकसान.मका पिकाचे झालेल्या नुकसानीची झाडे गाडीत चाऱ्यासाठी टाकताना.~सावदे शिवारात मका पिकाचे केलेले नुकसान.मका पिकाचे झालेल्या नुकसानीची झाडे गाडीत चाऱ्यासाठी टाकताना.