शासकीय अडचणी सोडविणार
जळगाव : लांबणीवर पडलेली विद्यार्थी परिषदेची निवडणूक रविवारी बिनविरोध पार पडली. अभाविप, मनसे व युवा सेनेच्या प्रतिनिधींनी निवडणुकीत फारसे स्वारस्य न दाखविल्यामुळे विष्णू भंगाळे यांच्या पॅनलच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. दरम्यान, निवडणुकीत अध्यक्षपदी सौरभ विजयकुमार देशमुख (र. ना. देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, भडगाव) तर सचिवपदी राहुल कृ ष्णा गावीत (केव्हीएसचे कला महाविद्यालय, विसरवाडी) यांची निवड झाली.
लोकसभा व नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमुळे विद्यार्थी परिषदेची निवडणूक लांबणीवर पडली होती. विद्यापीठाच्या आदेशानुसार संलग्नित महाविद्यालयांनी 'यू आर' आणि 'सी.आर' पदासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे विद्यापीठाकडे पाठवूनदेखील या निवडणुकांना विलंब झाला. निवडणुकीला उशीर झाल्यामुळे अध्यक्ष व सचिवपदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या हातात फक्त पाच महिने (३0 एप्रिल २0१५) आहेत. कमी कालावधी असल्यामुळे निवडणुकीपूर्वीच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या प्रतिनिधींनी सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता.
बिनविरोध निवड करण्याचे आवाहन
दुपारी दोन वाजता व्यवस्थापन परिषदेच्या सभागृहात कुलगुरू प्रा.सुधीर मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात विद्यार्थी परिषदेच्या १५ सदस्यांना निवडणूक बिनविरोध करा, असे आवाहन करण्यात आले. त्यानुसार सदस्यांनी आपआपसात चर्चा केली. अध्यक्षपदासाठी जिल्हा बॅँकेचे संचालक नानासाहेब देशमुख यांचे नातू सौरभ विजयकुमार देशमुख यांच्या नावाला सूचक म्हणून चैताली पुरुषोत्तम सुतारे यांनी तर अनुमोदन भूषण वामन बोरसे यांनी दिले. सचिवपदासाठी राहुल कृष्णा गावीत यांच्या नावाला सूचक म्हणून प्रतिभा युवराज सातरक तर अनुमोदन आकाश दीपक अहिरे यांनी दिले. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी कुलसचिव प्रा. ए. एम. महाजन यांनी निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. या वेळी विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक प्रा.सत्यजित साळवे, उपकुलसचिव वाय.डी. वाघमारे, कायदा अधिकारी एस. आर. भादलीकर, सहायक कुलसचिव ए. बी. कुलकर्णी, कक्षाधिकारी आर.बी. उगले, एन.जी. पाटील, सहायक कक्षाधिकारी रवींद्र पाटील, एस.बी. पाटील, एस.के. चौधरी, मच्छिंद्र पाटील, जगदीश शिवदे, सुहास कुलकर्णी, रवींद्र गायकवाड, एस.पी. राठोड, एन.जी. पवार, आर.ए. पाटील, भास्करराव पाटील उपस्थित होते. विद्यापीठ विकास आघाडी, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेस, एन.एस.यू.आय., भारतीय विद्यार्थी सेना या सर्वांनी एकत्रितपणे निवडणूक लढवली. यंदाच्या निवडणुकीतही विष्णू भंगाळे यांचे वर्चस्व दिसून आले आहे. शिरपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष रावसाहेब चव्हाण, सतीश महाले, सिनेट सदस्य अतुल कदमबांडे, हेमंत पाटील, विवेक महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढविण्यात आली. निवडणुकीत आघाडीच्या विजयासाठी अँड.कुणाल पवार, महेंद्र पाटील, राजेश वारके, पराग चौधरी, जयवंत भोईटे, हर्षल बिरारीस, ऋषिकेश सोनवणे, अमोल हडपे, सागर वाजपयी, गुणवंत वाघ, योगेश वाघ, रोहन सोनवणे, देवेंद्र मराठे, प्रवीण पाटील, तुषार पाटील, केतन महाजन, हेमंत कोल्हे, धवल पाटील, सागर पाटील, गणेश कौर, खगेश बोरसे यांनी परिश्रम घेतले.
-------------
आमच्या हातात फक्त पाच महिन्यांचा कालावधी आहे. विद्यार्थी हित लक्षात घेऊन आम्ही काम करणार आहोत. विद्यापीठातील प्रशासकीय कामकाजात विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येतात. त्या सोडविल्या जात नाही. याकडे आम्ही प्राधान्याने लक्ष देऊन काम करणार आहोत.
-सौरभ देशमुख, अध्यक्ष, विद्यार्थी परिषद
प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या असतात. विद्यापीठाकडे वारंवार पाठपुरावा करूनदेखील त्या सुटत नाहीत. अनेक वर्षानंतर आमच्या महाविद्यालयाला सचिवपद मिळाले असून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याकडे आमचा भर राहणार आहे.
-राहुल कृष्णा गावीत, सचिव, विद्यार्थी परिषद
सर्व पक्षांचे सहकार्य
वर्षानुवर्षांपासून विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहे. त्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून आमच्या पॅनलचे प्रतिनिधी निवडून येत आहेत. यंदाही आम्हाला एनएसयूआय, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेस, मनसे व युवा सेनेच्या प्रतिनिधींनी सहकार्य केले. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडली.
-विष्णू भंगाळे, सदस्य व्यवस्थापन परिषद
------------
विष्णू भंगाळे यांचा 'वरचष्मा'
विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांवर १९९७ सालापासून विष्णू भंगाळे यांचा वरचष्मा राहिला आहे. २000-२00१ व २00८-२00९ हे शैक्षणिक वर्ष वगळता भंगाळे यांच्या पॅनलच्या उमेदवाराला अध्यक्षपद मिळाले आहे. मनोज दयाराम चौधरी (१९९७-१९९८), विष्णू रामदास भंगाळे (१९९८-१९९९), जावेद पठाण (१९९९-२000), निर्भयकुमार विसपुते (२000-२00१), अतुल विजय कदमबांडे (२00१-२00२), स्वप्नील शशिकांत चौधरी (२00२-२00३), दिनेश जिजाबराव पाटील (२00३-२00४), शैलेंद्रसिंग देवसिंग महाले (२00४-२00५), जगदीश दयाराम महाले (२00५-२00६), सत्यजित उदय शिसोदे (२00६-२00७), दुर्गादासगिरी मधुकर गोसावी (२00७-२00८), वैशाली रमेश सुतार (२00८-२00९), संतोष धर्मादास पाटील (२00९-२0१0), पंकज दिलीप राजपूत (२0१0-२0११), राजेंद्र भगवंतराव शिंदे (२0११-२0१२), अमोल सुरेश पाटील (२0१२-२0१३), मयूरेश नरेंद्र कोल्हे (२0१३-२0१४).