यावल : खानदेशचे कुलदैवत असलेल्या तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या आडगाव येथील सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी मंदिराची नित्यसेवा व देखरेखीवरून वाद चव्हाट्यावर आला आहे. प्रकरण पोलीस ठाणे तसेच धर्मादाय आयुक्तांपर्यंत पोहोचले आहे.
मंदिराची नित्यसेवा व देखरेखीसाठी श्री मनुदेवी चॅरिटेबल ट्रस्ट, आडगाव या संस्थेची स्थापना केली असल्याचे पत्र संस्थेचे सचिव संत श्री बाबा महाहंसजी महाराज यांनी पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना दिले आहे. यापुढे मंदिराचे व्यवस्थापन श्री मनुदेवी चॅरिटेबल ट्रस्ट करणार असल्याचे पत्रात नमूद आहे. मंदिराचे व्यवस्थापन पाहणारी सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी सेवा प्रतिष्ठान या संस्थेस मंदिराचा धार्मिक विधी व व्यवस्थापन पाहण्याचा अधिकार नसल्याचे पत्रात नमूद आहे. त्यामुळेच धर्मादाय आयुक्तांकडून या न्यास नोंदणीस परवानगी मिळाली आहे.
मंदिराचे व्यवस्थापन पाहण्यासाठी तसेच नित्य सेवेसाठी नव्याने स्थापन झालेल्या संस्थेचे विश्वस्त मंडळ मंदिरावर गेले असता, त्यांची अडवणूक केली जात असल्याचे पत्रात नमूद केले आहे. मंदिर परिसरात वाद-विवाद होऊ नये म्हणून आपण त्यांना कायदेशीर प्रतिबंध करावा, अशी मागणीही पत्रात केली आहे.
संयुक्त धर्मादाय आयुक्ताकडे अपील दाखल
दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून मंदिराची नित्यसेवा व देखभाल करणाऱ्या सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी मंदिर सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शांताराम पाटील यांना याबाबत विचारले असता, मंदिराचे व्यवस्थापन सेवा प्रतिष्ठान पाहत असल्याचे सांगून नवीन संस्थेविषयी नाशिक येथील संयुक्त धर्मादाय आयुक्त यांचे न्यायालयात अपील दाखल केले असल्याचे सांगितले.