The sand tractor was run away from the revenue department | महसूल पथकाच्या ताब्यातून वाळूचे ट्रॅक्टर पळविले
महसूल पथकाच्या ताब्यातून वाळूचे ट्रॅक्टर पळविले

दापोरा, ता. जळगाव : दापोरा येथील गिरणा नदीपात्रात अवैद्य वाळूचा उपसा सुरूच असून शनिवार, २० रोजी ग्रामस्थांनी महसूल पथकाच्या ताब्यात दिलेले वाळूचे ट्रॅक्टर चालकाने पळवून नेले. ५ रोजीदेखील अश्याच प्रकारे ग्रामस्थांनी पकडलेले ट्रॅक्टर पळविले होते मात्र त्यावेळीदेखील कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
२० रोजी नदीपात्रात वाळूचा उपसा सुरू असताना नदीपात्रात माजी सरपंच गोविंदा तांदळे यांच्यासह ग्रामस्थ नदीपात्रात पोहचले. त्यावेळी नदीपात्रात ट्रॅक्टरमध्ये अवैधरित्या वाळू उपसा करत असल्याचे आढळून आले. ट्रॅक्टर मालक विकास ऋषिदास कोळी, रा.दापोरी, ता.एरंडोल यांच्या मालकीचे ट्रॅक्टरवाळू भरत होते. या ट्रॅक्टरवर क्रमांक एम.एच. १९, एपी.९४४५ क्रमांक होता तर ट्रॉलीवर क्रमांक एम.एच१९, डीएन ८८३७ क्रमांक होता. भरलेले वाळूचे ट्रॅक्टर नदीपात्रातून गावात आणले व दापोरा तलाठी सारिका दुरगुडे यांना माहिती दिली. तलाठ्यांसोबत मंडल अधिकारी अक्षय वाघ, तलाठी प्रवीण बेंडाळे, वनराज पाटील व बावीस्कर महसूल यंत्रणेचे पथक आले व पंचनामा करत असताना चालक ऋषिदास कोळी याने ट्रॅक्टर सुरू करून पळवून नेले.
महसूल पथकाला न जुमानता समोरून ट्रॅक्टर पळवून नेल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. वाळू माफियाकडून अशाच प्रकारे नेहमी पकडलेले वाहने पळून नेत असल्याच्या घटना घडत आहेत. कारवाईत सातत्य ठेऊन पोलीस यंत्रणादेखील सोबत ठेवावी, अशी मागणी होत आहे.
तालुका पोलिसात गुन्हा दाखल
तलाठी सारिका दुरगुडे यांच्या फिर्यादीवरुन तालुका पोलिसात चालक विकास ऋषिदास कोळी, रा.दापोरी, ता.एरंडोल यांच्याविरुद्ध अवैध वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.


Web Title: The sand tractor was run away from the revenue department
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.