सामनेर, ता. पाचोरा : राज्यातील अनेक उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना गेल्या १५ ते २० वर्षांपासून विनावेतन काम करावे लागले. शासनाने त्यांना २० टक्के पगार मंजूर केला; पण तो शालार्थ आय.डी. नसल्याने नियमित होत नाही. त्यामुळे त्वरित शालार्थ आय.डी. देऊन त्यांचा पगार नियमित व्हावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शाळा कमवी शिक्षक संघटनेचे राज्यसचिव अनिल परदेशी यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी आमदार सुधीर तांबे, आमदार किशोर दराडे यांना दिले आहे.
दिरंगाई टाळण्यासाठी राज्यातील शिक्षकांना शालार्थ आयडी देऊन तत्काळ अंशत: २० टक्के अनुदानावर शिक्षकांचा प्रश्न सोडवावा, अशी विनंती संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रा. दीपक कुलकर्णी, राज्य सचिव प्रा. अनिल परदेशी, राज्य कार्याध्यक्ष संतोष वाघ, राज्य उपाध्यक्ष राहुल कांबळे, नाशिक विभागाचे कार्याध्यक्ष कर्तारसिंग ठाकूर, प्रा. नीलेश गांगुर्डे, प्रा. पराग पाटील, प्रा. दिनेश पाटील, प्रा. नीलेश पाटील, प्रा. संदीप बाविस्कर, प्रा. सुधीर चौधरी, प्रा. गुलाब साळुंखे, प्रा. योगेश पाटील, प्रा. राजेंद्र साळुंखे, प्रा. रवी पवार, प्रा. विजय ठोसर आदी पदाधिकाऱ्यांनी केली आहे.