सेनेने बंडखोरांना दिल्या जागा : प्रभाग समिती ३ मध्ये चुरस
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिकेच्या चारही प्रभाग समित्यांचा सभापतींची निवड १२ रोजी होणार असून, यासाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत होती. यामध्ये प्रभाग समिती १ मध्ये भाजपचे बंडखोर नगरसेवक प्रा.सचिन पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे ही जागा बिनविरोध होणार हे निश्चित झाले आहे, तर प्रभाग समिती २,३ व ४ साठी एकूण आठ अर्ज दाखल झाल्यामुळे या प्रभाग समित्यांसाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे.
प्रभाग समिती सभापतींचा कार्यकाळ १२ रोजी संपुष्टात येत असून, यासाठी १२ रोजीच निवड होणार आहे. दरम्यान, यासाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत होती. शिवसेना, भाजप व एमआयएम मिळून एकूण २४ अर्ज सर्व राजकीय पक्षांनी घेतले होते. त्यातच काही प्रभागांमध्ये भाजपने बहुमत गमाविल्यामुळे काही जागा बिनविरोध होण्याची शक्यता होती. त्यानुसार, प्रभाग समिती १ ची जागा बंडखोरांच्या ताब्यात गेली आहे. प्रभाग क्रमांक ७ चे नगरसेवक प्रा.सचिन पाटील हे बिनविरोध झाले आहे. याबाबतची औपचारिक घोषणा १२ रोजी होणार आहे.
सेनेने दिली बंडखोरांना संधी
शिवसेनेच्या एकूण १५ नगरसेवकांपैकी कोणताही सदस्य प्रभाग समिती सभापती होण्यास इच्छुक नसल्याने, शिवसेनेने चारही जागांवर बंडखोर नगरसेवकांना संधी देण्यात आली आहे. ही संधी देत बंडखोरांची नाराजीही दूर करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून करण्यात आला आहे. दरम्यान, सोमवारीच निवडणुकीपूर्वी माघार घेण्याची मुदत देण्यात आली असून, सोमवारीच निवडणूक होईल की नाही, याबाबतचे चित्रही स्पष्ट होणार आहे.
या प्रभागांमध्ये होणार लढती
१. प्रभाग समिती २ मध्ये भाजपचे मुकुंदा सोनवणे व भाजपचे बंडखोर नगरसेवक प्रवीण कोल्हे यांच्यात लढत होणार आहे.
२. प्रभाग समिती ३ मध्ये चुरसीची लढत पहायला मिळत असून, या ठिकाणी एकूण चार अर्ज दाखल झाले आहेत. एमआयएमने अर्ज दाखल केल्यामुळे भाजपला विजयाची संधी आहे. भाजपकडून धीरज सोनवणे, भाजप बंडखोरांकडून रेखा पाटील तर एमआयएम कडून शेख सईदा व सुन्ना बी. देशमुख यांनी अर्ज दाखल केले आहेत.
३. प्रभाग समिती चारमध्येही सरळ लढत होण्याची शक्यता असून, या ठिकाणी भाजपने उषा पाटील तर भाजप बंडखोरांकडून शेख हसीना यांना संधी देण्यात आली आहे.