जळगाव : कोरोना बाधित रूग्ण महिलेवर उपचार केल्यानंतर तिच्याकडून शासकीय नियमानुसार बील न घेता २ लाख ४४ हजार रूपये ज्यादाचे आकारल्याप्रकरणी जिल्हा रूग्णालयाच्या आक्षेप निवारण समितीने ब्रेन अॅक्झॉन हॉस्पिटलला ही रक्कम परत करण्याचे आदेश दिले आहे.
तीन ते चार महिन्यापूर्वी जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू झाला होता़ त्यामुळे बाधितांची संख्या कमालीची वाढली होती. त्यातच नशिराबाद येथील उषा कावळे ही महिला कोरोना बाधित झाली होती. महिलेस उपचारार्थ शहरातील ब्रेन अॅक्झॉन हॉस्पिटल येथे दाखल केले होते. उपचारानंतर महिलेकडून ६ लाख ४० हजार रूपये बील वसुल करण्यात आले. मात्र बील देण्यात आले नव्हते. त्यामुळे ज्यादा बील आकारले असल्याची तक्रार महिलेने सामाजिक कार्यकर्ता दीपक गुप्ता यांच्याकडे केली होती. ज्यादा बील आकारल्याबाबत गुप्ता यांनी त्या रूग्णालयाविरूध्द जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री तसेच जिल्हा सामान्य रूग्णालयकडे तक्रार केली होती.
हॉस्पिटल प्रशासनाने सादर केलाच नाही खुलासा
जिल्हा सामान्य रूग्णालयात आक्षेप निवारण समितीत तक्रारीची दखल घेत ब्रेन अॅक्झॉन हॉस्पिटलला खुलासा सादर करण्याच्या सूचना केल्या. मात्र, हॉस्पिटल प्रशासनाकडून कुठलाही खुलासा झाला नाही. दुसरीकडे आक्षेप निवारण समितीत रूग्णाकडून वसूल केलेल्या बिलाचे अवलोकन केले असता, त्यामध्ये रूग्णाकडून २ लाख ४४ हजार रूपये अतिरिक्त आकारण्यात आल्याचे आढळून आले. त्यामुळे संबंधित रूग्णालयाला रूग्णाला ज्यादा आकारलेले बील परत करण्याचे आदेश समितीने दिले आहेत. त्या रक्कमेचा धनादेश जिल्हा रूग्णालयाच्या कार्यालयात जमा करण्याचेही आदेशात म्हटले आहे.