जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या उन्हाळी ऑनलाइन परीक्षांना सुरळीत प्रारंभ झाला असून परीक्षा झालेल्या काही विषयांचे निकाल केवळ तीन ते चार दिवसांत जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. निकाल जाहीर करण्यातही विद्यापीठ आघाडीवर आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षीदेखील ऑनलाइन परीक्षा घेतल्या जात आहेत. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात या परीक्षा होत असून कोणताही तांत्रिक व्यत्यय न येता या परीक्षा सुरळीत सुरू आहेत. प्रभारी कुलगुरू प्रा.ई. वायुनंदन व प्रभारी प्र-कुलगुरू प्रा. बी.व्ही. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षांचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. ८ जूनपासून प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष बी.एस.डब्ल्यू., बी.पी.ई., बी.ए.एम.सी.जे.च्या प्रथम व द्वितीय वर्ष तसेच डी.पी.ए., बी.ए. ॲडिशनल म्युझिक, बी.एफ.ए.च्या परीक्षा घेण्यात आल्या. १५ जूनपासून बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी.च्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या परीक्षा सुरू झाल्या. २५ जूनपासून एम.ए., एम.कॉम, एम.एस्सी., एम.एस.डब्ल्यू., एम.सी.ए., शिक्षणशास्त्र आणि पदवी व्यवस्थापनशास्त्राच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत.
७५९९२ विद्यार्थी प्रविष्ट
दरम्यान, २९ जूनपासून व्यवस्थापनशास्त्राच्या पदव्युत्तर वर्गांच्या परीक्षांना प्रारंभ होत आहे. ८ ते २३ जून दरम्यान झालेल्या परीक्षेसाठी ७५,९९२ विद्यार्थी प्रविष्ट होते. अद्यापपावेतो डी.पी.ए., बी.पी.ई., बी.ए.एम.सी.जे., बी.ए. ॲडिशनल म्युझिक या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आलेले असून सदर निकाल संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी. पाटील यांनी दिली आहे.