जळगाव : अकरावी प्रवेश अर्जाची प्रक्रिया अखेर मंगळवारी संपली. मुदतीच्या अंतिम दिवसापर्यंत साडेचार हजारांवर अर्ज प्राप्त झालेले असून, आता महाविद्यालयांनी गुणवत्ता यादी तयार करण्याची प्रक्रिया प्रारंभ केली आहे.
शिक्षण विभागातर्फे काही दिवसांपूर्वी अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले गेले होते. त्यानुसार शुक्रवार, २० ऑगस्टपासून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला होता. अखेर मंगळवारी ही प्रक्रिया लॉक झाली. अंतिम दिवशी विद्यार्थ्यांची अर्ज सादर करण्यासाठी महाविद्यालयांमध्ये धावपळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले. तर रात्री उशिरापर्यंत विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केले होते. दुसरीकडे यंदा सर्वाधिक विद्यार्थ्यांचा कल विज्ञान शाखेकडे असून या शाखेसाठी सर्वाधिक अर्ज महाविद्यालयांना प्राप्त झालेले आहेत. तर कला शाखेसाठी थेट प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. आता महाविद्यालयांनी गुणवत्ता यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. २७ ऑगस्ट रोजी गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर पुढील प्रवेशाची प्रक्रिया प्रारंभ होईल.