रावेरला तापी नदीपात्रातील दोन रोझपाईप पडले उघडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 04:09 PM2019-05-31T16:09:57+5:302019-05-31T16:11:12+5:30
रावेर येथील पालिकेच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेंतर्गत ऐनपूर शिवारात तापी नदीपात्रातील जॅकवेलचे दोन रोझपाईप नदीतील पाणी कमी झाल्याने उघडे पडले आहेत. त्यामुळे तीव्र उन्हाळ्यात पाणीटंचाईचा संभाव्य धोका लक्षात घेता पालिका प्रशासनाने पाणीपुरवठा योजनेची २०० फूट खोल कूपनलिकाही कोरडी पडली. पर्यायी कूपनलिकेची उपाययोजना युद्धपातळीवर केली जात आहे.
रावेर, जि.जळगाव : येथील पालिकेच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेंतर्गत ऐनपूर शिवारात तापी नदीपात्रातील जॅकवेलचे दोन रोझपाईप नदीतील पाणी कमी झाल्याने उघडे पडले आहेत. त्यामुळे तीव्र उन्हाळ्यात पाणीटंचाईचा संभाव्य धोका लक्षात घेता पालिका प्रशासनाने पाणीपुरवठा योजनेची २०० फूट खोल कूपनलिकाही कोरडी पडली. पर्यायी कूपनलिकेची उपाययोजना युद्धपातळीवर केली जात आहे.
तापी नदीपात्रातील पाणी आटले आहे. ठिकठिकाणी पात्र कोरडे पडले आहे. ते वाळूमय झाले आहे. परिणामी ऐनपूर शिवारातील रावेर पालिकेच्या पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलच्या चारपैकी दोन रोझपाईप आता उघड्यावर पडले आहेत. त्यामुळे जॅकवेलला होणारी पाण्याची आवक मंदावली आहे.
उर्वरित दोन रोझपाईप जॅकवेल लगतच्या डोहात आहेत. त्यामुळे जूनच्या मध्यापर्यंत पाणीटंचाईची तीव्रता जाणवणार नाही. मात्र पाऊस लांबल्यास लगतच्या दुसऱ्या डोहात तराफ्यावर फ्लोॅटंग वीजपंप बसवून पर्यायी उपाययोजना करण्याची व्यवस्था करण्याची संधी आहे. रावेर पालिकेच्या पाणीपुरवठा योजनेच्या स्टेशन रोडलगतची कूपनलिका बुजली गेली. त्यामुळे ती कोरडी पडली. पर्यायी भूजलस्त्रोत उपलब्ध करणे गरजेचे असल्याने आज त्याच ठिकाणी नवीन कूपनलिकेचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक अॅड. सूरज चौधरी, सुधीर पाटील, सूर्यकांत अग्रवाल व दिलीप शिंदे, पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता अतुल चौधरी, धोंडू वाणी, पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी तायडे उपस्थित होते.
ऐनपूर शिवारातील तापी नदी पात्रातील डोहात पुरेसे पाणी आहे. त्यामुळे तूर्त रावेर शहराला पाणीटंचाईचे सावट नसल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.
ऐनपूर शिवारातील तापी नदीपात्रातील जॅकवेलची रोझपाईप उघडी पडली असली तरी, सद्य:स्थितीत तापी नदीपात्रातील डोहात जलसाठा सुस्थितीत आहे. तूर्तास पाणीटंचाईचे सावट नसले तरी, पर्यायी कूपनलिकेचा भूजलस्त्रोत अचानक हरपला. नवीन कूपनलिकेचे काम सुरू आहे.
-अतुल चौधरी, कनिष्ठ अभियंता, पाणीपुरवठा योजना विभाग, न.पा., रावेर.