लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने रासेयो जिल्हा व विभागीय समन्वयक यांची कार्यशाळा सोमवार, २३ ऑगस्ट रोजी विद्यापीठात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम भवन येथे घेण्यात आली. यात रासेयोच्या स्वयंसेवकांनी आठवड्यातून एक दिवस खेड्याकडे चला, उपक्रम राबविण्याचे निश्चित करण्यात आले.
यावेळी मंचावर विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील, प्राचार्य एल.पी.देशमुख, रासेयो संचालक डॉ. पंकजकुमार नन्नवरे, जिल्हा समन्वयक डॉ. मनीष करंजे (जळगाव), डॉ.सचिन नांद्रे(धुळे) आणि डॉ. विजय पाटील (नंदुरबार) हे होते. कार्यशाळेत मार्गदर्शन करताना दिलीप पाटील यांनी २४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत रासेयोच्या एकक दत्तक गावात कवयित्री बहिणाबाई ग्राम वाचन कट्टा स्थापन करण्यात यावा, असे सांगितले. सुरुवातीस डॉ. नन्नवरे यांनी प्रास्ताविक केले. कार्यशाळेत झालेल्या चर्चेत २४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत रासेयो एककांमार्फत महारक्तदान शिबिर, वृक्ष लागवड, साक्षरता अभियान, सिकलसेल व साथीच्या रोगांबाबत जनजागृती अभियान, कुपोषण जनजागृती हे उपक्रम घ्यावेत, तसेच स्वतंत्रता दिन अमृत महोत्सव व विद्यापीठ नामविस्तार दिन यांचे औचित्य साधून महारांगोळी स्पर्धा, काव्य वाचन, कथाकथन, वक्तृत्व, साहित्य वाचन, ग्रंथ वाचन, वादविवाद, नाट्य साहित्य व पथनाट्य, मेहंदी यांसह स्थानिक भागातील पारंपरिक उपक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले.
गावा-गावात स्वच्छता अभियान
दरम्यान, कार्यशाळेत आठवड्यातून एक दिवस खेड्याकडे चला उपक्रम राबविण्याचे निश्चित करण्यात आले. या अंतर्गत त्या-त्या गावात स्वच्छता अभियान, कोविड लसीकरण, जलसंवर्धन, जल पुनर्भरण आदी उपक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले. यावेळी विभागीय समन्वयक डॉ. नितीन बडगुजर, डॉ.जगदिश सोनवणे, डॉ. आशुतोष वर्डीकर, डॉ.संजय शिंगाणे, डॉ.दत्ता ढाले, डॉ.प्रमोद पाटील, डॉ.हेमंतकुमार पाटील, डॉ.विशाल करपे, डॉ.नितीन बारी, प्रा.राजेंद्र मोरे, अभ्यास मंडळ सदस्य डॉ.किशोर पाठक, प्रा.संतोष खिराडे, प्रा.अशोक चित्ते हे उपस्थित होते.