धरणगाव : शहरातील गणाबाप्पानगरात एका ठिकाणी सहायक निबंधक कार्यालयाच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात धाड टाकून सावकाराच्या घराची झाडाझडती घेतली. यावेळी पथकाने तीन खरेदीखत जप्त केले आहेत. या कारवाईमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
या संदर्भात अधिक वृत्त असे की, सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाकडे रवींद्र पुंडलीक चौधरी यांच्याबाबत अवैध सावकारीच्या तीन तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक तथा सावकारांचे जिल्हा निबंधक संतोष बिडवाई यांनी घरझडतीसाठी एक पथक तयार केले.
या पथकात पथक प्रमुख म्हणून सहाय्यक निबंधक जे. बी. बारी, तर सदस्य शिल्पा सिंहले (सहकार अधिकारी प्रथम श्रेणी, पारोळा), सुनील पाटील (सहकार अधिकारी प्रथम श्रेणी, पारोळा), सुनील महाजन (सहकार अधिकारी द्वितीय श्रेणी,अमळनेर) यांचा समावेश होता.
या पथकाने शुक्रवारी पोलीस बंदोबस्तात धाड टाकली. साधारण दोन ते अडीच तास ही झाडाझडती चालली. या झाडाझडती तक्रारदारांचे तीन खरेदीखत आढळून आल्याचे कळते. दरम्यान, या संदर्भात सहायक निबंधक जे. बी. बारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आज आम्ही घर झडती घेतली. त्यात तीन खरेदीखत आणि इतर कागदपत्रे जप्त केली आहेत. याबाबतचा अहवाल लवकरच जिल्हा निबंधकांकडे पाठवण्यात येईल.
सेच या संपूर्ण धाडसत्राचे व्हिडिओ चित्रीकरण केल्याचे देखील कळते. दरम्यान, या धाडीमुळे अवैध सावकारी करणाऱ्या लोकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.