नोव्हेंबर २०१० मध्ये भुसावळ येथे घेण्यात आलेल्या आरटीओच्या शिबिरात डमी उमेदवार उभा करून अर्जावर दुसऱ्याच व्यक्तीचा फोटो चिटकवून लायसन्स काढण्याचा प्रयत्न झाला होता. तेव्हा मोटार वाहन निरीक्षक घनश्याम चव्हाण यांच्या फिर्यादीवरून भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गणेश कौतिकराव ढेंगे (रा.जळगाव) याच्याविरुध्द गुन्हा दाखल होऊन अटकेची कारवाई झाली होती. हे प्रकरण शांत होत नाही, तोच पुन्हा भुसावळातच गणेश ढेंगे याने डिसेंबर महिन्यात उमेदवार तपासणी अधिकारी तथा मोटार वाहन निरीक्षक गणेश पाटील यांच्या समक्ष डमी उमेदवार उभा करून कैलास ब्रिजलाल छाबडा (सिंधी कॉलनी, भुसावळ) यांच्या नावाचे दुचाकीचे लायसन्स मिळवून दिले. छाबडा यांनी शिकाऊ लायसन्स मिळविण्याकरिता सादर केलेले नमुना क्र.२ व इतर कागदपत्रे तसेच पक्के लायसन्ससाठी सादर केलेले नमुना क्र.४ व इतर कागदपत्रांच्या प्रती आरटीओच्या कार्यालयात आढळून आल्या आहेत. उमेदवाराच्या अर्जावर दुसऱ्याच व्यक्तीचा फोटो चिकटवून दुसराच उमेदवार हजर केल्याचे सिध्द झाले.
गुन्हा दाखल करण्याचे आदेश
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी खात्यांतर्गत चौकशीचे आदेश दिले होते. वरिष्ठ लिपिक दिलीप पाटील व कनिष्ठ लिपिक सचिन सानप यांनी केलेल्या चौकशीत तथ्य आढळून आले. त्यानुसार निरीक्षक गणेश पाटील यांना सर्व पुरावे, मुळ कागदपत्रांसह लायसन्सधारक कैलास छाबडा व गणेश ढेंगे यांच्याविरुध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश १३ जानेवारी रोजी दिले आहेत. मात्र अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही. आरटीओतील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांशी एजंटांचे लागेबांधे असल्याचे यापूर्वीही सिध्द झालेले आहे. अडीच वर्षापूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचेही लायसन्स आरटीओ कार्यालयातून काढण्यात आल्याचा प्रकार घडला होता.