लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - ग.स. सोसायटीच्या सत्ताधारी लोकसहकार गटासह विरोधी असलेल्या सहकार गटाच्या एकूण १४ संचालकांनी गुरुवारी राजीनामे दिले होते. मात्र, ही माहिती मिळताच अध्यक्षांनी व काही संचालकांनी एका रात्रीतच ८ शिपायांना पदोन्नती देत लिपिकपदी वर्णी लावली असल्याचा आरोप सहकार गटाचे गटनेते उदय पाटील यांनी केला आहे. याबाबत पाटील यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केली असून, याबाबत चौकशी करण्याची मागणी केली आहे.
गुरुवारी अध्यक्षांच्या विरोधात आरोप करत १४ संचालकांनी राजीनामे देऊन, अध्यक्षांना अल्पमतात आणले होते. संचालकांच्या राजीनाम्याची चर्चा बंद होत नाही तोवर ग.स. सोसायटीच्या अध्यक्षांसह काही संचालकांनी एका रात्रीत सोसायटीमधील आठ शिपायांना पदोन्नती देत त्यांची लिपिकपदी वर्णी लावली असल्याचा आरोप सहकार गटाकडून करण्यात आला आहे. तसेच ही पदोन्नती करत असताना संचालक मंडळाचा कुठलाही ठराव देखील झाला नसल्याचा आरोप उदय पाटील यांनी केला आहे. त्यामुळे ही पदोन्नती रद्द करून, या प्रकरणाची चौकशी करण्याची व अल्पमतात असलेल्या ग.स. सोसायटीवर प्रशासक नियुक्ती करण्याची मागणी उदय पाटील यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे.
तारखेत फेरफार करण्याचा आरोप
८ शिपायांची लिपिकपदी लावण्यात आली असून, याबाबतचे आदेश २७ जानेवारी रोजी देण्यात आल्याचे या आदेशात प्राथमिकरित्या दिसून येत आहे. मात्र, प्रोसिडिंगमध्ये २८ रोजीची तारीख न देता २७ तारीख दाखविण्यात आल्याचा आरोप उदय पाटील यांनी केला आहे. अशा प्रकारचा निर्णय घेताता कार्यकारी मंडळाचा ठराव करणे आवश्यक असते. मात्र, तसा कोणताही ठराव झालेला नसून, याबाबत केवळ कर्मचारी नियंत्रण समितीचा ठराव झाला असल्याची माहिती उदय पाटील यांनी दिली.
रात्री उघडण्यात आले कार्यालय
१४ संचालकांनी राजीनामे दिल्यानंतर अध्यक्षांसह काही संचालकांनी गुरुवारी कार्यालय उघडून हा निर्णय घेतला असल्याचा आरोप उदय पाटील यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे सादर केलेल्या तक्रारीत केला आहे. याबाबत चौकशी करण्याची मागणी देखील सहकार गटाकडून करण्यात आली आहे.
तीन अपत्याबाबाबत सोमवारी सुनावणी - जिल्हा उपनिबंधकांची माहिती
ग.स.सोसायटीचे अध्यक्ष मनोज पाटील यांना तीन अपत्य असल्याची तक्रार प्राप्त झाली असून, याबाबत प्राथमिक तपासणी करून सोमवारी सुनावणी घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक एस.एस. बिडवई यांनी ‘लोकमत’ला दिली.
कोट..
गुरुवारी सोसायटीच्या कार्यालयात मी गेलेलो नाही. तसेच ८ शिपायांना पदोन्नती देण्याचा निर्णय २७ रोजी झाला होता. या निर्णयाच्यावेळेस राजीनामे दिलेले लोकसहकार गटातील सदस्य देखील उपस्थित होते. त्यामुळे या आरोपात कोणतेही तथ्य नाही.
-मनोज पाटील, अध्यक्ष, ग.स. सोसायटी