जळगाव : परिवर्तन व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाउंडेशन आयोजित ‘स्व. पृथ्वीराज चव्हाण सांस्कृतिक महोत्सवा’ची सुरुवात होत असून, शुक्रवारी महोत्सवाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी उद्घाटनाच्या दिवशी महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्काराने सन्मानित नाटककार दत्ता पाटील, दुसऱ्या दिवशी मध्य प्रदेश शासनाचा प्रतिष्ठेचा कालिदास पुरस्कार प्राप्त चित्रकार श्याम कुमावत आणि महोत्सवाच्या समारोपप्रसंगी साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित बाल साहित्यकार आबा महाजन या मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच महोत्सवाचे उद्घाटन जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, आमदार चिमणराव पाटील, आमदार सुरेश भोळे यांची प्रमुख उपस्थितीत होणार आहे. महोत्सवाचा प्रारंभ हा लेखिका अमृता प्रितम व गीतकार साहिर लुधियानवी, इमरोज यांच्या प्रेमावर व जीवनावर आधारित शंभू पाटील लिखित “अमृता साहिर इमरोज’ या नाटकाने महोत्सवाची सुरुवात होणार आहे. प्रमुख भूमिका शंभू पाटील व हर्षदा कोल्हटकर यांची असून, दिग्दर्शन मंजूषा भिडे यांचे आहे. दुसऱ्या दिवशी अर्थात शनिवार, दि. २१ ऑगस्ट रोजी नाटकघर पुणेनिर्मित ज्येष्ठ नाटककार रामू रामनाथन लिखित व अतुल पेठे दिग्दर्शित शब्दांची रोजनिशी हे सध्या महाराष्ट्रभर गाजत असलेले नाटक सादर होणार आहे. महोत्सवाचा समारोप २२ ऑगस्ट रोजी "कबीर" या सांगीतिक कार्यक्रमाने होणार आहे. संत कबिरांच्या दोह्यांचे सादरीरण सांगीतिक पद्धतीने होणार आहे. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी नारायण बाविस्कर, मंजूषा भिडे, वसंत गायकवाड, होरिलसिंग राजपूत, सुदीप्ता सरकार, विनोद पाटील, मंगेश कुलकर्णी, डॉ. किशोर पवार, मनोज पाटील, प्रतीक्षा कल्पराज, राहुल निंबाळकर, सिद्धेष पाटील, अंजली पाटील, हर्षदा पाटील, हर्शल पाटील आदी परिश्रम घेत आहेत.