जळगाव : जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत म्हणून भरारी फाउंडेशनने शेतकरी संवेदना अभियान हाती घेतले आहे. या अभियानाच्या माध्यमातून आतापर्यंत तीन शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापासून रोखण्यात फाउंडेशनला यश आले आहे, तसेच अनेकांचे समुपदेशन केले जात आहे.
अलीकडच्या काळात देशभरात विविध अडचणींमुळे शेतकरी आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. शेतकरी बांधवांच्या निधनानंतर त्यांच्या परिवारावर मोठा संकटांचा डोंगर कोसळतो. कुटुंबाने काय करावे, हे त्यांना सुचत नाही. शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी भरारी फाउंडेशनने शेतकरी संवेदना अभियान सुरू केले आहे. अनेक शेतकरी आर्थिक विवंचनेत आहेत. मुला-मुलींचे लग्न, शिक्षण, सावकारी कर्ज, दुष्काळी परिस्थिती, लहरी निसर्गाचा फटका, अशा अनेक अडचणींमुळे शेतकरी डबघाईला आलेला आहे. अशावेळी शेतकऱ्यांच्या मनात नैराश्याची भावना निर्माण होते आणि शेतकरी आत्महत्या करतो.
११४ गावांतील ३० हजार शेतकऱ्यांचा सर्व्हे
भरारी फाउंडेशनच्या माध्यमातून पारोळा तालुक्यातील ११४ गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन तीस हजार शेतकऱ्यांना भेटून हा सर्व्हे करण्यात आला. शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन भरारी फाउंडेशनच्या माध्यमातून समस्या सोडविण्यासाठी शेतकऱ्यांना जोड व्यवसाय सुरू करण्यासाठी सहकार्य करणे, बी-बियाणे उपलब्ध करून देणे, तणावात असलेल्या शेतकऱ्यांचे समुपदेशन करणे, विविध शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, मुला-मुलींचे लग्न व शिक्षणासाठी मदत करणे, अशा प्रकारे आधार देण्याचे काम संस्था करत आहे.
समुपदेशनासह जोडधंद्यासाठी सहकार्य
पारोळा तालुक्यातील विटनेर येथील आनंदा मंजा अहिरे यांना भरारी फाउंडेशनच्या माध्यमातून शेतीला जोड व्यवसाय म्हणून ३५ हजार रुपये किमतींच्या सहा शेळ्या देण्यात आल्या, तसेच जामनेर तालुक्यातील माळपिंप्री येथील राहुल निकम हे शेतकरी आर्थिक अडचणीत असून, शेतातील पिकांना खते व कीटकनाशके घेण्यासाठी पैसे नसून त्यांना खते, बी-बियाणे व कीटकनाशके देण्यात आली.
...यांनी घेतले परिश्रम
कोरोनाकाळात घरातील कर्ता पुरुष गमावल्याने कुटुंबावर ओढवलेल्या आर्थिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी निराधार महिलांना स्वयंरोजगाराला चालना देऊन त्यांना आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशाने कविता अनिल मराठे व सुरेखा अनिल चव्हाण यांना भरारी फाउंडेशनतर्फे शिलाई मशीन देण्यात आली. या अभियानासाठी सचिन महाजन, दीपक परदेशी, विनोद ढगे, जयदीप पाटील, डॉ. स्वप्नील पाटील, सुदर्शन पाटील, रितेश लिमडा, दीपक विधाते व नीलेश जैन हे परिश्रम घेत आहेत. संपूर्ण अभियानाला जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, जिल्हा निवासी अधिकारी राहुल पाटील, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, रजनीकांत कोठारी, रवींद्र लढ्ढा, मुकेश हसवाणी, अमर कुकरेजा, संध्या सूर्यवंशी, रत्नाकर पाटील, अपर्णा भट, अनिल कांकरिया, अनिकेत पाटील, किशोर ढाके, सपन झुनझुनवाला, योगेश पाटील, नीलेश झोपे उपस्थित होते.