पाॕझिटिव्ह स्टोरी-  चाळीसगावी कोरोना रुग्णांची अक्षयतृतीया गोड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 02:10 PM2021-05-14T14:10:21+5:302021-05-14T14:11:56+5:30

शुक्रवारी कोरोना बाधितांची अक्षयतृतीया पर्वणी मोफत अन्नसेवा पुरविणा-या मित्र मंडळांसह सामाजिक संघटनांनी 'गोड' केली.

Positive Story- Chalisgaon Corona Patients | पाॕझिटिव्ह स्टोरी-  चाळीसगावी कोरोना रुग्णांची अक्षयतृतीया गोड !

पाॕझिटिव्ह स्टोरी-  चाळीसगावी कोरोना रुग्णांची अक्षयतृतीया गोड !

Next
ठळक मुद्देमोफत पुरणपोळी व आंब्याचा रस शिवभोजन थाळीतही स्वीट मेनू

चाळीसगाव :  कोरोनाने सणासुदीचा आनंद हिरावलाय.  अत्यंत साध्या पद्धतीनेही का असेना सण साजरे होत आहे. यातून सणाचा पारंपरिक गोडवादेखील जपला जातोय. शुक्रवारी कोरोना बाधितांची अक्षयतृतीया पर्वणी मोफत अन्नसेवा पुरविणा-या मित्र मंडळांसह सामाजिक संघटनांनी 'गोड' केली. त्यांना खान्देशी मेनू असलेले पुरणपोळी व आंब्याचा रस, तिखट आमटी, भात असे सुग्रास ताट वाढले.  शहरातील दोन्ही शिवभोजन केंद्रांवर अक्षयतृतीयेची स्वीट थाळी देण्यात आली. यापर्वणीवर गरजूंनी समाधान व्यक्त केले आहे.
शहरात दहाहून अधिक खासगी रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहे. बहुतांशी रुग्णालये फुल्ल झाले आहे. जवळपास तीनशे रुग्ण येथे उपचार घेत आहे. त्यांच्यासोबत नातेवाईकही आहेत. 
कोरोना काळात नाती दुरावली. अगदी रक्ताच्या नात्यांची वीण उसवली. मृतदेहांचे परस्पर अत्यसंस्कार करावे लागत आहे. तथापि, अशा भयावह व कठीण काळात सामाजिक संघटना, मित्रमंडळे, समाजमंडळे माणुसकीचा आधार घेऊनच पुढे आली आहेत. शहरात कोरोनाच्या दुस-या लाटेत उद्योजक वर्धमान धाडीवाल मित्र मंडळ, तेली समाज मंडळातर्फे कोरोनाबाधित व त्यांच्या सोबत असणा-या नातेवाईकांसाठी मोफत अन्नसेवा सुरू करण्यात आली आहे. याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शिवभोजन थाळीत आंब्याचा रस
शहरात भडगाव रोडस्थित चुलामृत व घाट रोडलगत असणा-या शिवमल्हार शिवभोजन केंद्रांवर शुक्रवारी अक्षयतृतीयानिमित्त मोफत थाळीत आंब्याचा रस, साधी पोळी, वरण भात असा मेनू देण्यात आला. दोन्ही केंद्रांवर गरजूंना ३०० थाळ्या वाटण्यात आल्या. गरजूंची आखाजीही गोड झाली आहे, अशी प्रतिक्रिया चुलामृत शिवभोजन केंद्राचे राहुल राजपूत यांनी  ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.


तेली समाजाची अन्नसेवाही 'गोड'
संताजी जगनाडे महाराज यांच्या स्मृतींचा जागर करीत येथील तेली समाजातर्फे कोरोनाबाधित व त्यांच्यासोबत असणा-या नातेवाईकांसाठी मोफत अन्नसेवा सुरू केली आहे. यासाठी प्रत्येक रुग्णालयात भ्रमणध्वनी देण्यात आले आहे. आखाजीनिमित्त अन्नसेवेत गोड पदार्थ म्हणून सोनपापडी देण्यात आली. दरदिवशी ८० ते १०० गरजूंना जेवण पुरविले जाते.


धाडीवाल मित्रमंडळाची गोड अन्नवारी
गेल्या दोन महिन्यांपासून उद्योजक वर्धमान धाडिवाल मित्र मंडळामार्फत कोरोनाबाधित व त्यांच्या सोबत असणा-या नातेवाईकांना मोफत थेट रुग्णालयांमध्ये जेवण दिले जात आहे. अक्षयतृतीयेची पर्वणीही गोड करण्यात आली. पुरणपोळी, आंब्याचा रस, तिखट मसाला आमटी, भात व कांदा - लिंबू असा अस्सल खान्देशी मेनू आखाजीच्या थाळीत वाढण्यात आला. घरासह आपल्या माणसांपासून दुरावलेल्या रुग्णांच्या मनावर मायेची फुकंर मारण्यासाठी आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे. अशी भावना वर्धमान धाडिवाल यांनी 'लोकमत'शी बोलतांना व्यक्त केली. सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप घोरपडे, संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिरसाट, वीरशैव गवळी समाजाचे विजय गवळी, समता सैनिक दलाचे धर्मभूषण बागुल आदींनी या अन्नवारीची पालखी खांद्यावर घेतली आहे.

Web Title: Positive Story- Chalisgaon Corona Patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.