सुनील पाटील
जळगाव : महामार्गावरील वाढते अपघात चिंताजनक असून हे अपघात रोखण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने स्वखर्चातून अपघातस्थळ व महामार्गावर कठड्यांची दुरुस्ती, सूचना फलक व रिप्लेक्टर बसविण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे. कन्नड घाटापासून त्याची सुरुवात करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी दिली.
शहरातून जाणाऱ्या महामार्गावर गेल्या महिन्यात गुजराल पेट्राल पंपाजवळ बापलेक ठार झाल्याची घटना घडली होती. महामार्ग प्राधिकरण किंवा मनपाने काही उपाययोजना केलेल्या असत्या तर या बापलेकाचा जीव वाचला असता, या घटनेची पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी गंभीर दखल घेऊन दुसऱ्याच दिवशी न्हाईचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा, कंत्राटदार व वाहतूक शाखा व महामार्ग पोलीस अधिकारी यांना सोबत घेऊन डॉ.मुंढे यांनी महामार्गावरील अपघातस्थळांना भेटी देऊन अपघात रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, याचे नियोजन केले होते. त्याच दिवशी सायंकाळी दोन्ही अपर पोलीस अधीक्षक, आठ विभागांचे पोलीस उपअधीक्षक व सर्व प्रभारी अधिकारी यांना अपघातस्थळांना भेटी देऊन जेथे गरज आहे तेथे दुभाजक तयार करणे, गतिरोधक, वळण रस्ता, धोकेदायक ठिकाण यासह वाहतूक नियमांचे तातडीने फलक लावण्याचे आदेश दिले होते. पोलीस दलाच्या निधीतून हा खर्च करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या होत्या. त्याची प्रत्यक्ष अमलबजावणी सुरु झाली आहे. चाळीसगाव तालुक्यात पाच जणांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर डॉ.मुंढे यांनी तेथे भेट दिली व कन्नड घाटातील खड्डे, रस्त्याच्याकडेचे संरक्षण कठडे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.
सहा महिन्यात २४२ जण ठार
जानेवारी ते जून या सहा महिन्यात जिल्ह्यात रस्ता अपघातात ६४२ जण ठार झाले आहेत. सर्वाधिक अपघात मे व जून महिन्यात झालेले आहेत. गेल्या काही दिवसापासून पाळधी ते नशिराबाद या दरम्यान महामार्गावर अपघाताची संख्या वाढली. गुजराल पेट्रोल पंपाजवळ बापलेक ठार झाले तर त्याआधी दूरदर्शन टॉवरजवळ दीड महिन्यापूर्वी लग्न झालेला तरुण ठार झाला होता. आता दोन दिवसापूर्वीच साखरपुडा झालेला व सहा महिन्यापूर्वी लग्न झालेला असे दोन तरुण अपघातात ठार झाले. महामार्गाचे काम अपूर्ण असल्याने पक्का रस्ता संपल्यानंतर कच्च्या रस्त्यावर हा अपघात झाला.
असे आहेत सहा महिन्यातील अपघात
महिना ठार
जानेवारी ३७
फेब्रुवारी ३५
मार्च ३५
एप्रिल ३१
मे ५१
जून ५३
कोट...
तातडीने जेथे आवश्यक आहे, तेथे पोलीस दलाच्या निधीतून हा खर्च केला जात आहे, उर्वरित ठिकाणी महामार्ग प्राधिकरण, बांधकाम विभागाने खर्च करावा अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. पोलीस दलाने कामाला सुरुवात केली आहे. लोकांचा जीव वाचवा हीच त्यामागची भावना आहे.
-डॉ.प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक