लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - शहरातील मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांना नुकसान भरपाईच्या नोटिसा बजाविल्या आहेत. मात्र, गाळेधारकांनी ही रक्कम अद्याप भरलेली नाही. याच पार्श्वभूमीवर उपायुक्त प्रशांत पाटील यांनी शहरातील रामलाल चौबे मार्केट व धर्मशाळा मार्केट येथे पाहणी केली. तसेच सर्व गाळेधारकांना सोमवारपर्यंत थकीत भाडे भरण्याचे आदेश दिले आहेत. थकीत भाडे भरले नाही तर सर्व गाळे सील करण्यात येतील असा इशारा उपायुक्तांनी दिला आहे. यामुळे गाळेधारकांमध्ये पुन्हा भीती पसरली आहे. दरम्यान, मनपा प्रशासनाने देखील गाळे सील करण्याबाबत रणनीती तयार केली असून, याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मनपा उपायुक्तांनी गाळेधारकांना थकीत भाड्याची रक्कम भरण्याचे आदेश दिल्यानंतर गाळेधारकांनी मनपा मार्केट गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांच्या नेतृत्वात व पांडुरंग काळे यांच्या मार्गदर्शनात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची पाळधी येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी माजी महापौर नितीन लढ्ढा व मनपा विरोधी पक्षनेता सुनील महाजन हे देखील उपस्थित होते. या विषयात त्वरित नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करुन मीटिंग लावून योग्य तो मार्ग काढण्यात येईल असे आश्वासन गुलाबराव पाटील यांनी दिले. यावेळेस राजस कोतवाल, संजय पाटील, तेजस देपुरा, पंकज मोमाया, वसीम काझी, युवराज वाघ, उदय झंवर, राजेश समदानी, रमेश तलरेजा, शिरीष थोरात, सुजित किनगे, अमोल वाणी, अमित भावनानी, सुनील रोकडे, प्रकाश गागडाणी, रमेश मधवाणी, दिनेश वालेचा, मनीष बारी, अमित गौड, हरिहर खुंटे यांच्यासह इतर गाळेधारक उपस्थित होते.
गाळ्यांबाबतचा प्रस्ताव महासभेत मांडणार
मनपा प्रशासनाने देखील आता मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांवर कारवाईच्या हालचाली तीव्र केल्या असून, याबाबतचा प्रस्ताव मनपा प्रशासनाकडून महासभेत मांडण्यात येणार आहे. ३ रोजी होणारी महासभा ही विशेष महासभा असल्याने नियमित होणाऱ्या महासभेत हा प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याची माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली.