जळगावात औषधीसाठी रुग्णांची पायपीट
By Admin | Updated: May 30, 2017 16:52 IST2017-05-30T16:32:18+5:302017-05-30T16:52:01+5:30
जिल्हा रुग्णालयात दुपारी औषधी केंद्र बंद : फक्त 11 औषधी दुकाने सुरू
जळगावात औषधीसाठी रुग्णांची पायपीट
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.30 - ऑनलाईन औषधी विक्री व पोर्टलला विरोध यासह इतर मागण्यांसाठी ऑल इंडिया केमिस्ट अॅण्ड ड्रगीस्ट असोसिएशनतर्फे पुकारलेल्या औषधी दुकाने बंदने रुग्णांच्या नातेवाइकांना औषधे घेण्यासाठी शहरात चांगलीच पायपीट करावी लागली. काही रुग्णांच्या नातेवाइकांना तर औषधे घेण्यासाठी पिंप्राळा, मेहरूणमध्ये रिक्षाने जावे लागले.
असोसिएशन अंतर्गत असलेल्या शहरातील सर्वच औषधी केंद्रचालकांनी बंदला प्रतिसाद देत औषधी केंद्र किंवा दुकान बंद ठेवले.
खाजगी रुग्णालयांमधील औषधी केंद्रही बंद होते. फक्त इंडे अमेरिकन गणपती मेडिकेअर हॉस्पिटल यांचे औषधी केंद्र सुरू होते. इतर रुग्णालयांमधील औषधी केंद्र बंद असल्याने संबंधित रुग्णालयांमध्ये दाखल रुग्णांच्या नातेवाइकांना औषधी घेण्यासाठी लांब अंतरावर जाऊन औषधी आणावी लागत होती.
काही केंद्र उशिरा सुरू झाल्याची तक्रार
अन्न व औषध प्रशासन विभागाने शहरातील 11 औषधी विक्री केंद्र सुरू राहतील, असे म्हटले होते. त्यांची यादीही जाहीर केली होती. पण हे केंद्र मंगळवारी सकाळी उशिराने सुरू झाले. त्याचा त्रास ग्राहकांना किंवा रुग्णांच्या नातेवाइकांना झाला.