पापडाच्या डाळींची मागणी निम्म्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 12:06 PM2019-12-12T12:06:22+5:302019-12-12T12:06:55+5:30

भाववाढीने सर्वच डाळींची मागणी घटली, नवीन तुरीची आवक लांबणीवर

Papal pulses are in demand at half | पापडाच्या डाळींची मागणी निम्म्यावर

पापडाच्या डाळींची मागणी निम्म्यावर

Next

जळगाव : यंदा झालेल्या अतिपावसामुळे उडीद-मूगाची आवक घटण्यापाठोपाठ नवीन तूरही अद्याप बाजारात आलेली नाही. जानेवारी महिन्यात नवीन तूर येण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. डाळींचे भाव प्रचंड प्रमाणात वाढल्याने गेल्या दोन आठवड्यांपासून डाळींना मागणीच नसून उडीद पापडांचा हंगाम सुरू झाला तरी पापडाच्या डाळींची मागणी निम्म्यावरच आहे.
यंदा अतिपावसामुळे खरीप हंगामात उत्पादन घटन्यासह दर्जावरही परिणाम झाला. उडीद, मूग काढणीच्या वेळीच जोरदार पाऊस झाल्याने बहुतांश माल डागी झाला. सोबतच उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली. परिणामी उडीद-मूग डाळीच्या आवकवरही परिणाम झाला. त्यामुळे या डाळींचे भाव वाढले. दिवाळीच्या काळात ८००० ते ८५०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या उडीद डाळीचे भाव सध्या ९५०० ते १०,००० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत. अशाच प्रकारे ८००० ते ८५०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या मुगाच्या डाळीचे भाव सध्या ८५०० ते ९००० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहे. दिलासादायक बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी उडीदाची डाळ ११००० ते ११५०० रुपये प्रती क्विंटलवर होती, मात्र मागणी घटल्याने हे भाव काहीसे कमी झाले आहे.
पापडाच्या डाळीची मागणी कमीच
डिसेंबर महिन्यापासून उडीद पापड तयार करण्यासाठी डाळीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. मात्र यंदा भाववाढीने ही मागणी ५० टक्क्यांवर आली आहे. या दिवसात दररोज ३०० ते ४०० क्विंटल उडीद डाळीची विक्री होते. मात्र यंदा ही मागणी १५० ते २०० क्विंटलवर आली आहे. ज्या ठिकाणी १० किलो डाळ पापडासाठी खरेदी केली जात होती, तेथे आता केवळ पाच किलो डाळीची खरेदी होत आहे.
तुरीची आवक लांबणीवर
अति पावसामुळे नवीन तुरीची आवकही अद्याप सुरु झालेली नाही. या दिवसात मराठवाड्यातील लातूर, दक्षिण भारतातून नवीन तूर येण्यास सुरुवात होते. मात्र ही आवक आता जानेवारीमध्ये सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे.
हरभरा चांगला येण्याच्या अंदाजाने भाव स्थिर
जोरदार पावसामुळे इतर कडधान्यावर परिणाम झाला असला तरी रब्बी हंगाम चांगला येण्याचा अंदाज असल्याने हरभरा डाळीचे भाव ५५०० ते ६००० रुपये प्रती क्विंटलवर स्थिर आहे.

अतिपावसामुळे उडीद-मुगाच्या डाळीचे भाव वाढल्याने सध्या मागणी घटली आहे. नवीन तुरीची आवक अद्याप सुरू झालेली नाही.
- प्रवीण पगारिया, अध्यक्ष, दाणाबाजार असोसिएशन, जळगाव

Web Title: Papal pulses are in demand at half

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव