लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ख्वाॅजामिया चौकातील गोकुळ स्वीट मार्ट या हॉटेलमध्ये समोशात पाल आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी दुपारी एक वाजता उघडकीस आला आहे. समोसा खात असताना एका तरुणाने चक्क पालच खाल्ल्याने त्याला उलट्या झाल्याने त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकारानंतर हाॅटेलमध्ये गोंधळ सुरू झाल्यामुळे तातडीने पोलिसांनी या दुकानावर धाव घेतली. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
खोटेनगरातील रहिवासी गौरव कृष्णा पाटील (२९) या तरुणासह त्याचे मित्र शंभू भोसले व हरीश भोसले हे दुपारी १ वाजेच्या सुमारास गोकुळ स्वीट मार्टमध्ये नाश्त्यासाठी गेले होते. या ठिकाणी गौरवने समोसा तर त्याच्या मित्रांनी खमण मागविले. समोसा अर्धा खाल्ल्यानंतर त्याला कडवटपणा जाणवला. त्याने समोसा पाहिल्यानंतर त्यात पालीची शेपटी आढळून आली. त्यानंतर त्याला काही वेळाने उलट्या झाल्या. पालीचा काही भाग खाल्ला गेल्याचे गौरवने माध्यमांना सांगितले. दरम्यान, त्याला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणीही त्याला उलट्या झाल्या व त्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात आले. जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलिस नाईक प्रदीप पाटील यांनी त्याचा जबाब नोंदविला.
काही काळ तणाव
काही वेळानंतर पोलिसांचे वाहन घटनास्थळी दाखल झाले. यानंतर या ठिकाणी काही प्रमाणात वाद झाला. बराच वेळ अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क होत नसल्याने शंभू व त्याचे मित्र हॉटेलवर थांबून होते. या प्रकारामुळे हॉटेलवर गर्दी जमली होती. दरम्यान, हॉटेलचे मालक सखाराम चौधरी हे हा प्रकार घडताच जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. तेव्हा जी तक्रार असेल ती पोलिस स्थानकात येऊन द्यावी, असे पोलिस शंभू भोसले यांना सांगत होते.
संतापात दोघांनी केली कचोरी परत
हा सर्व प्रकार घडत असताना अन्य दोघा ग्राहकांनी या हॉटेलवर येऊन कचोरी मागविली होती. त्याचदरम्यान समोशात पाल आढळून आल्याने त्यांनी संताप सुरू केला. त्यानंतर त्या दोघांनी तातडीने कचोरी ठेवून देत हॉटेलमालकाला चांगले फैलावर घेतले. पाल निघाली असताना दुकान बंद का केले नाही, असा सवाल उपस्थित करीत या दोघांनी प्रचंड संताप व्यक्त केला.