लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झालेल्या एका २२ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्याने उपचारासाठी दाखल केले. मात्र, तब्बल १२ दिवसांनंतर या तरुणाचा मृत्यू झाला. तीन दिवस नातेवाइकांची वाट पाहिल्यानंतरही कुणी न आल्याने अखेर बेवारस म्हणून या तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची वेदनादायक घटना समोर आली आहे. दाखल करणारे नातेवाईक मृत्यूनंतरही पुढे न आल्याने पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
मृत तरुणाला १० एप्रिल रोजी रात्री साडेबारा वाजता नातेवाइकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना २२ एप्रिल रोजी त्याचा मृत्यू झाला होता. रुग्णालय प्रशासनाने मृतदेह ताब्यात घ्यावा यासाठी नातेवाइकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु रजिस्टरवर ना नातेवाइकाचे नाव, ना संपर्क क्रमांक होता. त्यामुळे त्यांनी ही माहिती जिल्हापेठ पोलिसांना कळविली. पोलिसांनी देखील नातेवाइकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, काही माहिती मिळाली नाही. शासकीय नियमानुसार तीन दिवस मृतदेह जिल्हा रुग्णालयात ठेवला. त्यानंतर त्याचा दफनविधी करण्यात आला.
रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे जबाब घेणार
मृत झालेला रुग्ण तरुण आहे. त्यामुळे त्याच्या नातेवाइकांचा शोध घेतला जात आहे. त्याला दाखल करून घेताना रुग्णालयात केस पेपर ड्युटीला असलेले कर्मचारी, उपचार करणारे डॉक्टर, नर्स व इतर सर्वांचे जबाब नोंद घेण्यात येणार असल्याची माहिती तपासी अंमलदार फिरोज तडवी यांनी ‘लोकमत’ला दिली. दरम्यान, या तरुणाला दाखल करताना कोरोनाची लागण झालेली होती. मात्र, नेमके मृत्यूचे कारण समोर यावे यासाठी डॉक्टरांशी पत्रव्यवहार केला जाणार आहे. नातेवाईक मिळाल्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन केले जाईल, असेही तडवी यांनी सांगितले.