लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना प्रतिबंधात्मक लसीसाठी ठरविण्यात आलेल्या १३ केंद्रावर शुक्रवारी केवळ ४६ टक्केच लाभार्थ्यांनी लस घेतली. यात आठ केंद्रांवर ५० व त्यापेक्षाही कमी संख्या नोंदविण्यात आली आहे. केंद्र बदलले जाणार असून जिल्ह्यात नवीन केंद्रांवर नियुक्त करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
शुक्रवारी जिल्ह्यात ६०२ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली. यात सर्वाधिक ८० लाभार्थ्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात लस देण्यात आली. एकत्रित जिल्ह्यातील ५५५५ कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. अद्यापही कर्मचाऱ्यांच्या मनात भीती, कोरोनाचा कमी झालेला संसर्ग, अशा बाबींमुळे कर्मचारी पुढे येत नसल्याचे चित्र कायम आहे. विशेष बाब म्हणजे शुक्रवारी एकाही कर्मचाऱ्याला रिॲक्शन झालेले नव्हते.
हे आठ केंद्र कमी
पारोळा ११, पाचोरा २५, यावल २७, चाळीसगाव ३३, मुक्ताईनगर ३४, रावेर ३८, भुसावळ ३८, अमळनेर ४१.