जळगाव : मुसळधार पावसाचा कांदा पिकाला मोठा फटका बसला असून त्यामुळे किरकोळ बाजारात कांद्याचा दर ८० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. बाजारपेठेतील आवकही मंदावल्याने महागडा कांदाही विकत मिळेल की नाही, अशी शंका व्यक्त होत आहे.अवकाळी पावसाने जाता जाता दिलेल्या तडाख्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाचा फटका आता कांद्याच्या पिकालाही बसला असून तयार झालेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.नवीन कांदा बाजारात येण्यासाठी आणखी दीड ते दोन महिन्यांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे तोपर्यंत कांद्याचे दर हे जास्तच राहणार आहेत, असा अंदाज काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.जळगावच्या बाजारात धुळे, नंदूरबार, नाशिक, सोलापूर, नगर येथून कांदा येतो. मात्र पावसामुळे तोही खराब झाला आहे. त्यामुळे पूर्वी ४ हजार गोणी कांदा येत होता. आता त्याठिकाणी ३०० ते ४०० गोणी कांदाच येत आहे. परिणामी किरकोळ बाजारात कांद्याचे भाव वाढले आहेत. हे भाव आणखीन वाढण्याची शक्यता आहे.येणाºया कांद्यामध्येही १० ते १५ किलो कांदा फुकट जात आहे. त्यामुळे शेतकºयांबरोबरच व्यापारीही हवालदिल झाला आहे. भिजलेला कांदा जास्त प्रमाणात बाजारात असल्याचे दिसत असून त्याचे दरही ६० ते ७० च्या घरात आहे. त्यामुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. सुका कांदा आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसल्यामुळे ओला कांदा किरकोळ स्वरुपात घेण्यावर ग्राहक भर देत आहेत. भविष्यात हे दर आणखीन भडकण्याच्या शक्यतेने आहे त्या दरात ग्राहक कांद्याची उचल करत आहेत.लसूणही ३०० रुपयांपर्यंत पोहोचलीकिरकोळ बाजारात लसूणचे दर ३०० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. जळगाव बाजारपेठेत इंदोर, म्हैसूर या बाजारपेठेतून लसूण मागवलाजातो. घाऊक बाजारात या लसणाचे दर १०० ते १२५ रुपयांपर्यंत आहेत. मात्र किरकोळ बाजारात हेच दर ३०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे ग्राहकराजा आर्थिक कोंडीत सापडला आहे.
कांद्याने गाठला ८० चा टप्पा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 22:05 IST