जळगाव : बीएचआर घोटाळ्यातील मास्टरमाईंड सुनील झंवर व मुख्य सूत्रधार जितेंद्र कंडारे यांच्या शोधार्थ पुणे आर्थिक गुन्हे शाखेतील अधिकारी, कर्मचारी यांचा दीडशे जणांचा ताफा जळगावात आला होता. त्याशिवाय डझनभर अधिकारी, कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथक राज्य व इतर राज्यांत फिरत असताना पुणे गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक रवींद्र गवारी व पोलीस नाईक शिरीष गावडे या दोनच शिलेदारांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या. त्यासाठी भूक, तहान व झोप विसरून कंडारे याच्यावर सलग सात तर झंवर याच्यावर दहा दिवस पाळत ठेवली आणि हे बडे मासे गळाला लागले.
बीएचआरचा तपास आणि संशयितांची भागमभाग चित्रपटातील कथानकाला शोभेल अशीच आहे. उपनिरीक्षक रवींद्र गवारी यांनी ‘लोकमत’कडे आपले अनुभव कथन केले. शेकडो कोटींच्या घरात गैरव्यवहार असलेल्या बीएचआर पतसंस्थेचा अवसायक जितेंद्र कंडारे व सुनील झंवर यांनाच अटक करणे एक आव्हान होतं. दोघांचे राजकीय व्यक्तींशी असलेले संबंध व वारंवार त्यांच्याकडून अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला जात होता. हा अर्ज मंजूर झाला असता तर पुणे पोलिसांची मोठी नाचक्की झाली असती, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत दोघांना अटक करायचीच आहे, असा चंग उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी बांधला होता व त्याची खास जबाबदारी गवारी व अंमलदार शिरीष गावडे यांच्यावर सोपवली होती, असे गवारी यांनी सांगितले.
सुताराच्या बायकोच्या मोबाइलवरून फोन केला अन् कंडारेचा घात झाला
१) गुन्हा दाखल झाल्यापासून कंडारे इंदूर, राजस्थान, दिल्ली व गुजरातमध्ये फिरत राहिला. काही महिन्यांपूर्वीच तो इंदूरमध्ये गेला होता. तेथे एका कारपेंटरकडे (सुतार) त्याने काम मागितले. जळगाव येथून आलेलो आहे. कौटुंबिक पातळीवर तणावात आहे, त्यामुळे काही दिवस इकडेच थांबणार असल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार कारपेंटरने एका जुन्या इमारतीत त्याला १० बाय १० ची एक खोली घेऊन दिली. कारपेंटरकडे पावत्या, बिल व इतर कागदपत्रे तयार करण्याचे काम त्याने केले. २८ दिवस काम केल्यानंतर साडेपाच हजार रुपये त्याला देण्यात आले.
२) ठावठिकाणा समजू नये, यासाठी त्याने अनेकवेळा मोबाइल सिम बदल केले. एकेदिवशी त्याने कारपेंटरच्या बायकोच्या सिमचा वापर करून स्वत:च्या बायकोला फोन केला. हा फोनच त्याच्यासाठी घातक ठरला. इकडे पोलिसांनी त्याचे मित्र, नातेवाईक व संबंधित सर्वांचेच मोबाइल नंबर लोकेशनवर टाकलेले होते. एक साधा मेसेज देखील दुर्लक्षित केला नाही. त्यामुळे पोलिसांनी या नंबरचा छडा लावण्यासाठी इंदूर गाठले. तेथे कंडारेची सासुरवाडी व इतर नातेवाईक असताना तो त्यांच्याकडे गेला नाही.
३) त्याच्याकडे गडगंज पैसा असल्याने तो महागड्या हॉटेलमध्ये असावा, त्याच्याकडे महागडी कार असावी म्हणून त्याच दृष्टीने पोलीस तपास करीत होते. या कारपेंटरच्या बायकोचा कंडारेच्या बायकोशी काय संबंध म्हणून पोलिसांनी सलग सात दिवस कारपेंटरचा पाठलाग केला. एकेदिवशी कंडारे मेसमध्ये जेवायला आला आणि पोलिसांचे काम फत्ते झाले. तेथेही दाढी वाढलेली, अवतार बदललेला होता व त्यामुळे त्याची ओळख पटत नव्हती. त्याचे फोटो काढून उपायुक्त नवटके यांना पाठविले. त्या देखील गोंधळात पडल्या. जुना फोटो काढला असता त्याच्या हातावर एक धागा आढळून आला व आताच्या फोटोतही तोच धागा दिसला. त्यावरून कंडारेची खात्री पटली.
पुत्रावरील फोकसने पोहोचविले पित्यापर्यंत
१) सूरज झंवर याला जामीन झाल्यानंतर पोलिसांनी सूरजवरच फोकस केला. तो वडिलांना भेटेलच किंवा फोनवर तरी बोलणं होईल, याचा ठाम विश्वास असल्याने पोलिसांनी सूरजवर पाळत ठेवली. जळगाव, अहमदाबाद, इंदूर असे त्याच्या मागावरच राहिले. याच काळात डोंगलचे लोकेशन मिळाले. त्यातील सिमकार्ड हे जळगावातून रिचार्ज झाले होते. त्या डोंगलचा वापर सुनील झंवर करीत असल्याचे निष्पन्न झाले.
२) त्या माहितीच्या आधारावर पोलीस इंदूरला पोहोचले. तेथून तो थेट मुंबईच्या दिशेने निघाला. पोलिसांनी त्याला पाहिलेले नव्हते, केवळ लोकेशनच्या आधारावरच त्याचा पाठलाग सुरू होता. नाशिकमध्ये पोहोचल्यावर एक मेसेज केल्यानंतर मोबाईल बंद झाला. त्यामुळे पोलिसांच्या अडचणी वाढल्या. पंचवटी भागात मोबाइल बंद झाल्याने पोलिसांची अडचण झाली.
३) त्यामुळे चारचाकी रस्त्याच्या बाजूला लावून रात्रभर पोलिसांनी हॉटेल, लॉजिंगची तपासणी केली. संशय येऊ नये म्हणून घरफोडीचा आरोपी शोधत असल्याचे पोलिसांना सांगावे लागत होते. अशातच पहाटेच्या सुमारास सूरज झंवर वापरत असलेली कार (क्र. एम.एच. ७० जी. ०००१) कार दिसली. हीच कार इंदूरमध्येही दिसली होती.
३) याठिकाणी साडेदहा वाजता कार जवळ आल्यावर पोलिसांनी त्याच्या कारच्या पुढे त्यांची कार आडवी लावली अन् उपनिरीक्षक गवारी यांनी ‘झंवर साहेब आपणच का?’ अशी त्याला विचारणा केली. त्याने हो म्हणताच, क्राईम ब्रँच पुणे असे सांगताच झंवरचा चेहरा पडला आणि त्याला ताब्यात घेतले.