जळगाव : हॅलो, मी प्रतीक बोलतोय, तू मला आवडतेस असे म्हणत अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या १७ वर्षीय मुलीशी अश्लील संभाषण करून तिचे लग्न मोडण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी प्रतीक नावाच्या मुलाविरुद्ध विनयभंग व बाल लैंगिक अधिनियम १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका महाविद्यालयात ११ वीच्या वर्गात शिक्षण घेत असलेली १७ वर्षीय विद्यार्थिनी २९ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता घरी असताना तिच्या मोबाइलवर एका तरुणाने कॉल केला व मी प्रतीक बोलतोय, तू मला आवडतेस असे म्हटला, त्यावर या मुलीने मी तुला ओळखत नाही असे सांगितले असता मी तुला ओळखतो, असे म्हणत अश्लील शब्दप्रयोग केला. त्यानंतर त्याने मी तुझे लग्न होऊ देणार नाही, लग्न मोडेल अशीही धमकी दिली. या प्रकाराने घाबरलेल्या मुलीने आई, वडिलांना माहिती दिली. त्यांनी मुलीला घेऊन शहर पोलीस स्टेशन गाठले. ज्या क्रमांकावरून कॉल आला, तो क्रमांक व नाव पोलिसांकडे दिले. पीडितेच्या फिर्यादीवरून ७२१८३२०००९ या क्रमांकाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील करीत आहेत.