लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हाभरात कोरोनाच्या संसर्गाचा आलेख घसरलेलाच असल्याची समाधानकारक स्थिती कायम आहे. शुक्रवारी जिल्ह्यात ९ कोरोना बाधित आढळून आले असून ९ रुग्ण बरे झाले आहेत. यात जळगाव शहरात १ बाधित आढळून आला असून ५ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या ही दोन्ही लाटांमध्ये प्रथमच ८ वर आली आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी आरटीपीसीआरचे ११२९ अहवाल समोर आले, त्यात १ बाधित रुग्ण समोर आला आहे. तर अँटिजेनच्या २२०७ तपासणी झाल्या असून त्यात ८ बाधित आढळून आले आहेत. यात चोपडा, चाळीसगाव व मुक्ताईनगरात रुग्ण आढळून आले आहेत. चाळीसगावात सर्वाधिक ४ रुग्ण समोर आले आहेत. जिल्हाभरातच कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे. पॉझिटिव्हिटीही घटत आहे. शुक्रवारी जिल्ह्याची पॉझिटिव्हिटी ही ०.०८ टक्के समोर आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हे दिलासादायक चित्र कायम आहे.
१४ तालुके दहाच्या खाली
चाळीसगाव तालुका वगळता सर्वच तालुक्यांमध्ये सक्रिय रुग्णांची संख्याही दहापेक्षा कमी झाली आहे. यातील रावेर व बोदवड तालुक्यात एकही सक्रिय रुग्ण नसून धरणगाव, भडगाव, पारोळा या तालुक्यात प्रत्येकी १ रुग्ण आहे. जळगाव तालुका १०, भुसावळ ७, चोपडा ८ या ठिकाणचे रुग्ण वगळता सर्व तालुक्यांमध्ये पाच पेक्षा कमी रुग्ण आहेत.
शहरातील आठवडाभरातील रुग्णसंख्या
२३ जुलै ०१
२४ जुलै ००
२५ जुलै ००
२६ जुलै ०१
२७ जुलै ००
२८ जुलै ०२
२९ जुलै ००
३० जुलै ०१