लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा रुग्णालयाच्या वादग्रस्त व्हेंटिलेटर खरेदी प्रक्रियेत चौकशी समितीचे प्रमुख डॉ. यू. बी. तासखेडकर यांच्यासह तिघांना अहवाल सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी नोटिसा देण्यात आल्या आहेत. यात तुम्ही हे व्हेंटिलेटर स्वीकारलेच का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. ज्यांच्यावर या प्रकरणात आरोप आहेत त्यांनीच या नोटिसा काढल्या असून यावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला आहे.
व्हेंटिलेटर खरेदी प्रकरणाच्या चौकशीत समितीकडून गेल्या आठवडाभरापासून कामकाज सुरू आहे. यात अनेकवेळा चौकशी पूर्ण होऊनही त्यात वारंवार बदल केले जात असून चौकशीची व्याप्ती वाढविली जात आहे. मात्र, हे पुरवठादाराने दिलेल्या मशीन स्वीकारण्यासाठी धडपड सुरू असल्याचा आरोप यातील तक्रारदार दिनेश भोळे यांनी केला आहे. चौकशी अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला आहे. हा अहवाल सीलबंद पाकिटातच दिल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी सांगितले आहे. दरम्यान, त्यातच आता प्रशासन अधिकारी डॉ. यू. बी. तासखेडकर, डॉ. सुशांत सुपे, भांडारपाल मिलिंद काळे यांना नोटीस देऊन विचारणा करण्यात आली आहे.
उपस्थित झालेले प्रश्न
१ प्रशासकीय अधिकारी व पुरवठादाराचे प्रतिनिधीच मॉडेल बदलल्याचे व नंबर बदल्याचे लिहून देत आहेत. ही बाब जाहीर झाल्यानंतर मग
पुरवठादाराला नोटीस दिली जाते. जाहीर झाले नसते तर विचारणा झालीच नसती का?
२ ज्यांच्यावर आरोप आहेत, त्यांची चौकशी करण्यासाठी त्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी समितीत असणे गरजेचे होते, मात्र, प्रशासकीय
अधिकारी, कंत्राटी कर्मचाऱ्यांमार्फत ही चौकशी केली जाते असे का?
३ व्हेंटिलेटर का स्वीकारले अशी विचारणा भांडारपाल व दोन अधिकाऱ्यांना होत आहे. मात्र, ही विचारणा अहवाल पूर्ण झाल्यानंतर थेट
नोटीस देऊन करण्यात आली. आधी ही विचारणा का झाली नाही? शिवाय जे चौकशी करताय त्यांनाही ही नोटीस देण्यात आली आहे.