लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : चार महिन्यांनंतर जळगाव जिल्हा परिषदेला पूर्ण वेळ अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मिळाले आहेत. धुळे येथील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक बाळासाहेब मोहन यांची या ठिकाणी बदली झाली असून, ते सोमवारी पदभार स्वीकारणार असल्याची माहिती त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
पदभार घेताच एसीईओ मोहन यांच्यासमोर पंचायत राज समितीचे आव्हान असेल. अंदाज समिती गेल्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या सर्व कामांचा आढावा घेण्यासाठी पंचायत राज समिती २२ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. समितीसमोर यशस्वी कामे मांडणे, आढावा देणे हा मुख्य उद्देश सध्या असेल, त्यानंतर जिल्हा परिषदेतील अन्य कामांबाबत नियोजन करणार असल्याचे बाळासाहेब मोहन यांनी सांगितले. अधिकारी मोहन हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी असून, धुळे येथे ते जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेत प्रकल्प संचालक म्हणून ३ वर्षे कार्यरत होते.
जि. प.ला दिलासा
जळगाव जिल्हा परिषदेत पंचायत राज समितीचा दौरा जवळ येत असताना पूर्ण वेळ अधिकाऱ्यांच्या कमतरतेचा मुद्दा गंभीर बनला होता. त्यातच अनेक अधिकाऱ्यांकडे दोन किंवा तीन विभागांचा अतिरिक्त कार्यभार होता. मात्र, गेल्या आठवडाभरात जिल्हा परिषदेला दोन नवीन अधिकारी मिळाले आहेत. त्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक मीनल कुटे यांनी पदभार स्वीकारला आहे, तर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बाळासाहेब मोहन हे सोमवारी पदभार घेणार आहेत.