लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आता पुन्हा प्रदुषणामध्ये वाढ होत आहे. ही प्रदुषणाची वाढती पातळी कमी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन बालरोगतज्ञ डॉ. निलिमा नेहेते यांनी केले.
एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवसाचे औचित्य साधून ‘रस्ता सुरक्षा जागरूकता’ व ‘प्रदूषणाचे मानवी शरीरावर कोव्हिडच्या होणारे दुष्परिणाम’ या विषयांवर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले हाेते. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी स्वप्नील जवारकर यांची प्रमुख उपस्थिती होती. समन्वयक प्रा.नफिस काझी यांनी प्रास्ताविक मांडले. दरम्यान, कार्यक्रमात वायू, ध्वनी, पाणी या परिचित असलेल्या प्रदूषणासोबत इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटचा अतिवापर मानसिक आरोग्यासाठी कसा घातक आहे, हे डॉ. निलिमा नेहेते यांनी विविध उदाहरणांसह स्पष्ट केले. त्यानंतर वाहन चालवितांनाची आदर्श बैठक व स्थान, चालकावर मोबाईल व अल्कोहोलमुळे होणारे दुष्परिणाम या विविध पैलूंवर आपले स्वप्नील जवारकर यांनी भाष्य केले. या ऑनलाईन कार्यक्रमात प्रा. डॉ. एस. आर. सुरळकर, प्रा. डॉ. एम. हुसेन, प्रा. एन. के. पाटील, प्रा. व्ही. एस. पवार, प्रा अतुल करोडे, प्रा. दीपक बगे आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. एन. एम. काझी व प्रवीण पाटील यांनी केले.