भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्वरातील ‘मेरी आवाज ही पहचान है’ या गाण्यातील शब्द आठ दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत आणि पुढेही या आवाजाचे गारूड रसिकांवर सदैव राहणार आहे. या आवाजाने आपल्या आयुष्याला जो आनंद दिला, जे वळण दिले हे अभूतपूर्व म्हणता येईल. लता मंगेशकर या नावाचा चमत्कार आणि जादू अलौकिकच. देवाने फारच विचार करून हा असामान्य आवाज घडवला आहे.
लहान मुलाला झोपवताना गायली जाणारी अंगाई असो, शाळेतील वंदेमातरम् किंवा गणेशोत्सवातील गाणी, भारतीय माणूस लतादीदींची गाणी ऐकतच घडला आहे. जणू त्यांचा एक संस्कारच भारतीय मनावर झाला आहे.
ज्या दिवशी भारतीय चित्रपट सृष्टी बोलायला लागली तेव्हापासून त्यांचा आवाज कानावर येत आहे. परमेश्वरापर्यंत क्षणार्धात नेण्याचे सामर्थ्य असणाऱ्या ‘लता’ नावाच्या या दैवी सुराचा जन्म २८ सप्टेंबर रोजी झाला. रंगभूमीवरील एक नामवंत गायक नट मास्टर दीनानाथ आणि
शुद्धमती सगळे त्यांना माई म्हणत त्यांचे लता हे थोरले अपत्य. त्यांचे खरे नाव हृदया होते. पण, बलवंत नाटक कंपनीचे मालक असणारे वडील मास्टर दीनानाथ त्यांना ‘लतिका’ या गाजलेल्या भूमिकेमुळे लता म्हणत. पुढे हेच नाव सर्वतोमुखी होऊन प्रत्येकाच्या हृदयात वसले. त्यांनी अनेक भाषेत गाणी गाऊन विक्रम केला आहे. फक्त मराठी,हिंदी भाषेतील गाणी आठवली तरी ती अगणित आहेत.
संत कबीर, सूरदास यांच्याबरोबर मराठीतील अनेक संतांच्या भजनांनी भक्तिभाव निर्माण केला आहे. सुंदर ते ध्यान, अरे अरे ज्ञाना झालासी, उठा उठा हो सकळीक, रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा, अवचिता परिमळू अशी भक्ती गीते, याचबरोबर अशा कैक पिढ्या असतील की, ज्यांनी
लतादीदींच्या गाण्यातून प्रेमाची प्रेरणा घेतली आहे. मग, ते प्रेम बहीण भावाचे असो, वडील व आईचे किंवा प्रियकर-प्रेयसीचे असो. पितृ प्रेमासाठीचे कल्पवृक्ष कन्येसाठी हे गाणे पुरेसे आहे. प्रेम आणि रोमँटिक मूड तरुण-तरुणींमध्ये रुजवण्यामागेही लतादीदींची हजारो गाणी आहेत.
मास्टर दीनानाथांच्या निधनानंतर घरची सगळी जबाबदारी येऊन पडल्याने मास्टर विनायकांच्या बोलावण्यावर त्या कोल्हापूरला गेल्या. ‘प्रफुल्ल पिक्चर्स’ च्या चिमुकला संसार, माझे बाळ, गजाभाऊ अशा चित्रपटातून भूमिकाही केल्या. आणि नंतर दत्ता डावजेकर यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली पार्श्वगायनाची सुरुवात केली आणि पुढे त्यांची कीर्ती दिगंत पसरली. त्यांची आई त्यांना भारतरत्न मिळाले होते तेव्हा म्हणाली होती, तू स्वतःला खूप मोठी गायिका किंवा मोठी
महिला समजू नकोस. तू एक साधारण व्यक्ती आहेस. सर्व काही परमेश्वर देत आहे. हे तुला वडिलांच्या आशीर्वादाने मिळालेले आहे. आणि असाच विचार त्या नेहमी करतात. लता मंगेशकर हे नावच इतकं जादूमय आहे की,त्यांच्या सारखी महान गायिका आपल्या देशात
जन्मली हे आपले भाग्यच. त्यांचं स्वर्गीय गाणं सतत आपल्याला समृद्ध करत राहणार आहे. त्यांना निरामय आयुष्य लाभो अशा शुभेच्छा......
..