जळगाव : मनपा प्रशासनाला शहरातील मूलभूत सुविधांच्या कामांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या बहुप्रतीक्षित २५ कोटी रुपयांच्या कामांचा मुहूर्र्त अखेर ठरला आहे. शुक्रवारपासून २५ कोटींपैकी मंजूर असलेल्या १८ कोटीतून १३ कोटींच्या कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस शहरात आले असता, त्यांनी शहर विकासासाठी २५ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता. मात्र, या निधीतून कुठलेही काम मार्गी लागले नव्हते. तसेच मनपा निवडणुकीमध्ये देखील २५ कोटींच्या निधीचा मुद्दा गाजला होता. अखेर उशिरा का होईना २५ कोटींच्या निधीतून कामांना सुरुवात होणार आहे.२५ कोटीच्या निधीची बांधकाम, विद्युत विभाग व पाणीपुरवठा विभागात विभागणी करण्यात आली आहे. त्यातील बांधकाम विभागाकडून १३ कोटी ५० लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. १३ कोटीतून १० कोटी रुपयांच्या गटारी बांधण्यात येणार आहेत. लेंडी नाल्यासह इतर पुलांच्या बांधणीसाठी ३ कोटींची तरतूद आहे. तसेच इच्छादेवी ते डी मार्ट व कोट चौक ते गणेश कॉलनी चौकापर्यंत दुभाजक तयार करण्यात येतील. यासाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ५५ लाखात एसएमआयटी कॉलेजकडे जाणाऱ्या नाल्याचेही स्थलांतर करण्यात येणार आहे. या सर्व कामांसाठी अंतिम कार्यादेश देण्यात आले आहेत.उर्वरित ७ कोटी रुपयांच्या कामांचेही नियोजन मनपा प्रशासनाने केले आहे. पहिल्या महासभेत या कामांचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे.७ कोटी रुपयांच्या निधीतून १० कामे निश्चित करण्यात आली असून, यामध्ये नेरीनाका स्मशानभूमीत गॅस दाहिनी बसविण्यात येणार आहे. यासाठी ८५ लाख रुपयांचे नियोजन आहे. शहरातील वाढीव भागातील पथदिव्यांसाठी व्यवस्था तसेच पोल उभारण्यासाठी ५१ लाख रुपयांची तरतूद केली आहे.शहरातील प्रमुख नाल्यांच्या संरक्षण भिंतीसाठी २ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. तर फुले मार्केट ते नेरी नाक्यापर्यंत दुभाजकांची उंचीदेखील वाढवली जाणार आहे.
जळगावात २५ कोटींच्या कामांचा ठरला मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 15:55 IST
मनपा प्रशासनाला शहरातील मूलभूत सुविधांच्या कामांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या बहुप्रतीक्षित २५ कोटी रुपयांच्या कामांचा मुहूर्र्त अखेर ठरला आहे.
जळगावात २५ कोटींच्या कामांचा ठरला मुहूर्त
ठळक मुद्देजळगावकरांना मिळणार लवकरच दिलासाशुक्रवारपासून १३ कोटींंच्या कामांना होणार प्रारंभ७ कोटीतून स्मशानभूमीत गॅस दाहिनी