लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनामुक्त गावांमध्ये इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरी महाविद्यालये मात्र बंदच आहेत. महाविद्यालये सुरू केव्हा होणार? याकडे विद्यार्थ्यांसह प्राचार्य, प्राध्यापकांचे लक्ष लागून आहे. जर बाजारपेठा, राजकीय दौरे तसेच सभा सुरळीतपणे सुरू आहेत तर महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी का दिली जात नाही, असा सवाल आता विद्यार्थी संघटनांकडून उपस्थित केला जात आहे.
इयत्ता आठवी ते बारावीतील विद्यार्थ्यांच्या तुलनेत महाविद्यालयीन विद्यार्थी हे कोरोनाविषयक नियमांचे पालन अधिक चांगल्या प्रकारे करू शकतात, असे असतानाही नेमकी महाविद्यालयेच बंद का? असाही प्रश्न विद्यार्थ्यांमधून उपस्थित केला जात आहे.
००००००००००
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
बाजारपेठा, राजकीय दौरे व सभा असे सर्व क्षेत्र सुरळीत सुरु असताना शैक्षणिक क्षेत्राला मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी नेहमीप्रमाणे दुर्लक्षितच केले आहे. शालेय शिक्षण विभाग यांनी शाळा सुरू करण्यासंदर्भात सूचना व उपाययोजना केलेल्या असताना देखील उच्च व तंत्रशिक्षण विभाग कुठल्याही प्रकारची योजना करताना दिसून येत नाही. उच्चशिक्षण मंत्र्यांनी विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी तत्काळ कोविड नियमांचे पालन करून महाविद्यालय सुरु करण्यासंदर्भातली कार्यवाही करणे आवश्यक आहे.
~सिद्धेश्वर लटपटे, प्रदेश मंत्री अभाविप
००००००००००
महाराष्ट्रात प्रत्यक्षात शिक्षण सुरु होणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी गेल्या दोन वर्षांपासून शिक्षणापासून वंचित आहेत. ग्रामीण भागात नेटवर्क, विद्युत अडचणी तसेच आर्थिक परिस्थिती बेताची अशा अनेक समस्यांमुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील देखील विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहत आहेत. तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी देखील सांगितले आहे की, जे ग्रामीण भाग कोरोनामुक्त झालेत अशा गावातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रत्यक्षात शाळा सुरु करण्याची परवानगी द्यावी आणि शाळा व महाविद्यालय प्रत्यक्षात सुरु करा हीच भूमिका महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन सातत्याने मांडत आहे.
- अरुण चव्हाण, सचिव, महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन
०००००००००००
काय म्हणतात प्राचार्य
शासनाने पदवी अभ्यासक्रमांचे वर्ग सुरू करण्याबाबत परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घ्यावा. ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. प्रात्यक्षिके होत नाहीत, त्यामुळे प्रत्यक्ष महाविद्यालये सुरू होणे गरजेचे आहे.
- राजेंद्र वाघुळदे, प्राचार्य, धनाजी नाना महाविद्यालय
००००००००००००००
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रोटेशन पद्धतीने बोलविणे सोपे नाही. कारण विषयनिहाय वर्ग बदलत असतात. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालय सुरू करणे जिकिरीचे आहे. शाळेतील तास सलग सुरू असतो. महाविद्यालयात तसे नाही. शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे.
-प्रा.डॉ. एल.पी.देशमुख, प्राचार्य, नूतन मराठा महाविद्यालय