लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील कोरोना बाधितांचे गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत सध्या मृत्यू घटले आहेत, मात्र, थांबलेले नाहीत त्यामुळे २५ ऑक्टोबरपासून २.३८ टक्के असलेला मृत्यूदर हा महिनाभरानंतरही २.३८ टक्क्यांवरच कायम आहे. हा दर एक टक्का नेण्याचे उद्देश असल्याचे मध्यंतरी आरोग्य यंत्रणेकडून सांगितले जायचे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या मृतांची संख्या ही १३०२ झालेली आहे. त्यामुळे रोजचे होणारे मृत्यू थांबवणे हे यंत्रणेपुढील आव्हान कायम आहे.
रुग्ण घटले, मृतांची संख्याही घटली म्हणून निश्चींत राहणे योग्य ठरणार नाही, असे वरिष्ठ पातळीवरून वारंवार सांगितले जात आहे. मात्र, जिल्ह्यात रुग्ण संख्या, बाधितांचे प्रमाण घटत असल्याचे पाहून चाचण्यां अचानक घटल्याने ही बाब आगामी काळात धोकेदायक ठरू शकते, असेही काही तज्ञांचे मत आहे. जळगाव शहर वगळता अन्य ग्रामीण भागात चाचण्यांचे प्रमाण प्रचंड घटले आहे. रुग्णच नाही, रुग्णच येत नाही, अशी कारणेही यामागे दिली जातात. मात्र, संर्साचा फैलाव होण्यासाठी ही बाब पुरेशी ठरू शकते, कोरोनाच्या सुरूवातीला हीच बाब अतिशय धोकादायक ठरली होती. त्यामुळे मृत्यू पूर्णत: थांबवायचे असल्यास हायरिस्क लोकांकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे चित्र आहे.
या तालुक्यात सर्वाधिक मृत्यू कंसात मृत्यूदर
जळगाव - ३५९ (२.३७%)
भुसावळ - १७० (४.०० %)
अमळनेर - १६३ (२.३०%)
रावेर - १०१ (४.७४ %)
चाळीसगाव -७५ (२.०९ %)
चोपडा -७४ (२.०९ %)
पाचोरा - ७३ (३.७० %)
पन्नास वर्षाखालीलही मृत्यू
गेल्या काही दिवसांपासून मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये ५० वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या रुग्णांचा समावेश होता. एकत्रित चित्र बघता १५५ रुग्ण हे पन्नास वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाचे होते, मात्र, यातील बऱ्याच रुग्णांना अन्य व्याधी असणे आणि रुग्णालयात उशिरा दाखल होणे ही मृत्यूची कारणे असल्याचे डॉक्टारांचे म्हणणे आहे.