अमळनेरात सोमवारच्या जनता कर्फ्यूस प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 07:08 PM2021-01-04T19:08:42+5:302021-01-04T19:10:51+5:30

सोमवारच्या ‘बंद’ला सर्व व्यापारी बांधव आणि लहान मोठ्या व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेऊन प्रतिसाद दिल्याने बंद यशस्वी झाल्याचे दिसून आले.

Monday's public curfew response in Amalnera | अमळनेरात सोमवारच्या जनता कर्फ्यूस प्रतिसाद

अमळनेरात सोमवारच्या जनता कर्फ्यूस प्रतिसाद

Next
ठळक मुद्देसर्व दुकानदारांनी दिला प्रतिसाद, मात्र ‘नो व्हेइकल डे’ ठरला नावालाच

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : शहरात याआधी रविवारच्या ‘जनता कर्फ्यू’ला व्यापारी संघटनांचा विरोध झाला असताना सोमवारच्या ‘बंद’ला सर्व व्यापारी बांधव आणि लहान मोठ्या व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेऊन प्रतिसाद दिल्याने बंद यशस्वी झाल्याचे दिसून आले. मात्र ‘नो व्हेइकल डे’ला कोणीच गांभीर्याने न घेतल्याने हा उपक्रम कागदावरच राहिला.

नियमांचे उल्लंघन केल्याने हॉटेल चौधरी व मगन चौधरी या दोघांवर पालिकेच्या अतिक्रमण पथकातील राधेश्याम अग्रवाल व कर्मचाऱ्यांनी प्रत्येकी ५०० रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई केली. या ‘बंद’मध्ये केवळ मेडिकल दुकाने, कृषी विक्रेते, दुग्ध व्यावसायिक, दवाखाने आदींना ‘बंद’मधून वगळण्यात आल्याने ही दुकाने सुरळीत सुरू होती. मात्र किराणा, कापड दुकान, जनरल स्टोअर्स, हॉटेल व्यावसायिक, भाजी व फळ विक्रेतेसह इतर दुकाने सकाळपासून रात्रीपर्यंत बंदच होती. यामुळे बाजारपेठेत रस्त्यावर बऱ्यापैकी शुकशुकाट होता.

दरम्यान व्यापारी व व्यावसायिकांचा मिळालेला प्रतिसाद पाहता सोमवारचा जनता कर्फ्यू नियमित राहू शकेल, अशी शक्यता असून सोमवारच्या ‘बंद’ला मात्र भाजीपाला अडते, किरकोळ विक्रेते, यासह काही दुकानदारांचा मात्र विरोधच आहे. याशिवाय अमळनेर शहर व्यापारी महासंघाचादेखील या ‘बंद’ला विरोध आहे.

‘नो व्हेइकल डे’लाच आरटीओ कॅम्प कसा?

अमळनेर नगरपरिषदेने शासन निर्देशानुसार ‘माझी वसुंधरा’ या अभियानातंर्गत गेल्या तीन आठवड्यापासून शहरात दर सोमवारी ‘नो व्हेइकल’ डे जाहीर केला आहे. या उपक्रमास जनतेनेच पाहिजे तेवढे गांभीर्याने न घेतल्याने दर सोमवार ‘व्हेइकल डे’च ठरत आहे. या सोमवारी प्रशासनाने जनता कर्फ्यूदेखील जाहीर केल्याने आता तरी ‘बंद’मुळे नागरिक एक दिवस आपली वाहने पार्क करून ‘नो व्हेइकल डे’ यशस्वी करतील, अशी अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा फोल ठरली आहे. खरे पाहता नो व्हेइकल व जनता कर्फ्यू असे उपक्रम राबविताना प्रशासनाचादेखील एकमेकांशी ताळमेळ नसावा, असे दिसते. कारण एकीकडे ‘नो व्हेइकल डे’ असताना दुसरीकडे शहरातील विश्रामगृहात आरटीओ कॅम्प ठेवण्यात आला होता. तसेच ग्रा. पं. निवडणुकीची माघारीची अंतिम मुदत असल्याने ग्रामीण मंडळी मोठ्या प्रमाणात शहरात आली होती. त्यामुळे या दिवशी जनता कर्फ्यू कसा? असा सवाल जनतेने उपस्थित केला.

Web Title: Monday's public curfew response in Amalnera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.