लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्यानंतर उपचार करण्यासाठी ज्या यंत्रणेत सामान्य जनता धाव घेत असते, त्याच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मोकाट कुत्र्यांचा उच्छाद वाढला आहे. गंभीर बाब म्हणजे या कुत्र्यांनी गेल्या १० ते १५ दिवसात तीन ते चार लोकांना चावा घेतला आहे. यात एका डॉक्टरांचाही समावेश आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एक डॉक्टर दोन दिवसापूर्वी त्यांच्याच विभागातून बाहेर पडत असताना एका कुत्र्याने त्यांना चावा घेतला. यानंतर त्यांनी तातडीने उपचार घेतले. याच कुत्र्याने काही दिवसापूर्वी एआरटी सेंटरच्या आवारात एका रुग्णाच्या नातेवाईकाला तर अन्य एका व्यक्तीला चावा घेतला होता. महापालिका प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने, आधीच जनता त्रस्त असताना आता या मोकाट कुत्र्यांनी त्यांचा मोर्चा रुग्णालयाकडे वळविला आहे. त्यामुळे जीएमसीच्या यंत्रणेचा ताप वाढला आहे.