अजिंठा चौफुलीनंतर कालिंका माता मंदिराजवळील रस्ता हा सर्वात धोकादायक रस्ता आहे. या ठिकाणी महामार्गावरील रहदारी आणि एस.टी वर्कशॉप आणि जुन्या गावातून येणारी रहदारी एकत्र येते. मात्र या महिन्याच्या सुरुवातीला चौकात दुभाजकाचे काम केल्यानंतर तेथे वळण घेण्यासाठी जागाच ठेवली नव्हती.
आता काय होणार या ठिकाणी ?
स्थानिक नागरिकांनी याबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर याबाबत महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह या ठिकाणी पाहणी केली. त्यानंतर दुभाजकाचा काही भाग तोडून तेथे वळण घेण्यासाठी रस्ता करून दिला गेला. आता या ठिकाणी एक लहान सर्कल करून वळण घेण्यासाठी सोय करून दिली जाणार आहे. त्यासाठी प्रस्तावदेखील तयार केला जाईल.
काय आहे समस्या
दुभाजक तोडल्यानंतर देखील येथे वळण घेण्यास अडचणी येत आहे. चारचाकी वाहन नेतांना चालकाला मोठी कसरत करावी लागते. येथे तात्पुरती उपाययोजना न करता कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
आयएमआरजवळ देखील हीच समस्या
शिवकॉलनीकडे जातांना आयएमआरजवळदेखील अशाच प्रकारे वळण रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक जणांना विरुद्ध दिशेने जावे लागते. अग्रवाल चौक ते शिव कॉलनी या दरम्यान विद्युत कॉलनी येथे वळण घेण्यासाठी जागा सोडली आहे. मात्र त्याऐवजी आयएमआरजवळ वळण घेण्यासाठी रस्ता करून द्यावा, अशी मागणी होत आहे.
कोट - परिसरातील नागरिकांनी केलेल्या आंदोलनानंतर या दुभाजकाचा काही भाग काढून तेथून वळण घेण्यास जागा करून दिली. मात्र अजूनही तेथे समस्या आहे. तात्पुरता उपाय न करता महामार्ग प्राधिकरणाने कायमस्वरूपी तोडगा काढावा - शैलेश काळे, नागरिक.