एकीकडे कोरोनासारख्या महाभयंकर रोगाने ग्रासले असल्याने शेतकरी त्यामधून कसाबसा सुटका करीत आहे. थोड्याफार प्रमाणात समाधान वाटत असताना आता पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांच्या संकटात अजून भर पडली आहे. कोरोनाच्या महाभयंकर रोगामुळे शासनाने कडक लॉकडाऊन लावला होता. त्यात शेतकऱ्यांच्या पिकांना बाजारभाव, तर मिळालाच नव्हता व शेतातील खर्चदेखील पुरेसा निघाला नव्हता.
शेतकरी शेवटी कर्जबाजारीकडे जात होता. आता पावसाळा सुरू होऊन एक ते सव्वा महिना झाला. त्यात १-२ पाऊस सुरुवातीला पडले; पण त्यानंतर पावसाने दांडीच मारल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला असून, अजून परत दुबार पेरणीचे संकट निर्माण होते की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावेळी परिसरात बऱ्याच शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली असून, अजून जर का पाऊस झाला नाही तर दुबार संकट निर्माण होईल. शेतकऱ्यांनी घेतलेली महागडी बियाणे वाया जातील, एवढे मात्र निश्चित.
आता सध्या विहिरींनादेखील पाहिजे तसे पाणी नाही व दुसरीकडे मन्याड धरणातदेखील अजून आवक नाही. त्यामुळे जिकडे-तिकडे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. कोरोनाच्या संकटातून बाहेर पडून थोड्याफार प्रमाणात शेतकरी सावरत असताना आतातरी पावसाने जोरदार हजेरी लावून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील संकट दूर करून कोरोनाची भर या पावसाने जोरदार हजेरी लावून दूर करावी, अशी इच्छा व्यक्त करताना दिसत आहेत.