लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासनाच्या ३० आमदारांच्या अंदाज समितीच्या सदस्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वच विभागांचा आढावा घेतला. या आढावा बैठकीदरम्यान जिल्ह्यातील अपूर्ण योजना व कामांबाबत तीव्र शब्दात आक्षेप घेतला. तसेच सर्वच शासकीय कार्यालयातील विभागप्रमुखांनी आपापल्या विभागांची माहिती अपूर्णावस्थेत दिल्यामुळे सर्व विभागप्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
शासनाच्या तीस आमदारांच्या अंदाज समितीच्या सदस्यांनी मंगळवारपासून आपला आढावा घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली. या समितीमध्ये एकूण ३० आमदार असून, जिल्हा दौऱ्यावर एकूण १७ आमदार आले आहेत. बुधवारी अजून काही आमदारदेखील जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. मंगळवारी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत व्हेंटिलेटर घोटाळ्यासह जळगाव शहरातील अमृत योजना, शिवाजीनगर पूल, घनकचरा प्रकल्प, बोदवड उपसा सिंचन, अंजनी-पद्मालय प्रकल्पासह आरोग्य विभागाचा आढावा घेतला. मात्र, सर्वच विभागांचा आढावा घेतल्यानंतर अधिकाऱ्यांचा ढिसाळ कामावर समिती सदस्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.