लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मेहरुण तलावात मासे पकडत असताना अचानक जाळ्यामध्ये पाय अडकून बुडत असलेल्या तरुणाला शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी वाचविले. शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
तलावाच्या शेजारी बांधकाम सुरू आहे. या ठिकाणचे तीन तरुण हे मासे पकडण्यासाठी तलावात लांबपर्यंत पाण्यात उतरले होते. अचानक यातील एक तरुणाचा पाय जाळ्यात अडकल्याने तो बुडू लागला. त्याच्या सोबतच्या दोन मुलांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना ते शक्य होत नव्हते. तलाव परिसरात राहणारे महेश वंजारी यांना ही बाब लक्षात आली. त्यांनी तातडीने शेजारी राहणाऱ्या आनंदराव मराठे यांना ही बाब सांगितली. त्यांनी तातडीने घरातून दीडेश फूड दोर व लाइफ जॅकेट मागविले. काही नागरिकांनी बॅटरी दाखवून तातडीने या मुलाला बाहेर काढण्यात आले. आणखी काही वेळ उशीर झाला असता तर कदाचित हा मुलगा वाचला नसता कारण त्याच्याबरोबरचे दोघेही तरुण थकून गेलेले होते. असे आनंदराव मराठे यांनी सांगितले.