जळगाव : नाशिकपाठोपाठ जळगाव जिल्ह्यातही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये बंडाचे झेंडे फडकावण्यात आले असून जिल्हाध्यक्ष ललित कोल्हेंसह ४८ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. पक्षात कार्यकर्ता म्हणून काम करीत राहू, असे ललित कोल्हे यांनी पत्रपरिषदेत सांगितले. वैयक्तिक कामे व कौटुंबिक कारणांमुळे आपण राजीनामा दिला आहे, असे सांगतानाच कोल्हे म्हणाले की, निवडणुकीदरम्यान पक्षनेतृत्वाने दुर्लक्ष केले. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांची सभा नियोजित होती, पण ती ऐनवेळी रद्द झाल्याचे कळविले गेले. संपर्क प्रमुख विनय भोईटे यांनी तसा संदेश दिला होता. राज यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यांच्या अवतीभोवती असलेल्या लॉबीचा त्रास आहे. ही मंडळी निवडणुकीच्या काही दिवस अगोदर सक्रिय झाली, असा दावा त्यांनी केला. यासोबत शहर कार्यकारिणीमधील पदाधिकाऱ्यांनी देखील राजीनामे दिले असून, फॅक्स तसेच इतर माध्यमांद्वारे ते ठाकरे यांच्याकडे पाठविले आहेत.
जळगावातही बसला मनसेला फटका !
By admin | Updated: November 6, 2014 15:23 IST