धुळे : खान्देशच्या कलावंतांनी मराठी चित्रनगरीत आपल्या अभिनयाची छाप उमटवित, धुळ्य़ाच्या सूनबाई लीना सुधीर देवरे यांनी 'विटीदांडू' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. २१ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.विटीदांडू या चित्रपटाची निर्मिती लीना देवरे यांनी केली आहे. त्या धुळे महापालिकेचे सभागृह नेते कमलेश देवरे यांच्या वहिनी आहेत. शहरातीलच बालकलावंत राधिका देवरे हिनेही चित्रपटात भूमिका केली आहे, तर कापडणे येथील ऋषीकेश पाटील कार्यकारी निर्माते आहेत. अभिनेत्री मृणाल ठाकूर या शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील रहिवासी आहेत. खान्देशच्या कलावंतांनी व्यावसायिक पातळीवर केलेला हा अनोखा प्रयोग आहे.हिंदी चित्रपट अभिनेते अजय देवगण हा चित्रपट आपल्या अजय देवगण फिल्म्स संस्थेच्या बॅनरखाली प्रदर्शित करीत आहेत. प्रसिद्ध कलावंतांची भूमिकाया चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकर, रवींद्र मंकणी, अशोक सर्मथ यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. श्रीरंग गोडबोले, मानवेल गायकवाड, ऋषीकेश परांजपे यांनी गीते लिहिली आहेत, तर शंकर महादेवन, सुनिधी चौहान, मानवेल गायकवाड, मेघना मिश्रा, उदेश उमप यांनी गीते गायली आहेत. या चित्रपटाची कहाणी महाराष्ट्रीय संस्कृतीचे दर्शन व आजोबा-नातूच्या हळव्या संबंधांवर आधारलेली आहे. गहन व रोमांचक कथा, स्वातंत्र्य युद्धाच्या रक्तरंजित पार्श्वभूमीवर चित्रित करण्यात आलेली आहे. भाव, भावनांचे संबंध रेखाटणारा जिवंत कलाकृतीतून अनोखा संदेश देणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या सेलीब्रेशनसाठी अभिनेते अशोक सर्मथ, अभिनेत्री मृणाल ठाकरे व निर्मात्या लीना देवरे हे पुढील आठवड्यात धुळे येथे येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे सभागृह नेते कमलेश देवरे यांनी दिली.
धुळ्य़ाच्या सूनबाईची मराठी चित्रपट निर्मिती
By admin | Updated: November 20, 2014 13:32 IST