कारवाई रोखण्यासाठी जमा झाला शेकडोंचा जमाव : तणावपूर्ण परिस्थिती हाताळून मनपाने केली कारवाई पूर्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील शाहू नगर भागात मनपाच्या शिक्षण मंडळाला मिळालेल्या जागेवर एका खासगी संस्थेने कब्जा केला होता. ही जागा मनपा प्रशासनाने बुधवारी ताब्यात घेतली. या कारवाईदरम्यान या भागात शेकडोंचा जमाव जमा झाल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. किरकोळ शाब्दिक वादानंतर ही जागा मनपाने ताब्यात घेऊन, याठिकाणी असलेल्या चार खोल्यांना मनपाने सील लावले आहे.
नगरपालिकेच्या काळात एका खासगी संस्थेने मनपा शिक्षण मंडळाला शाहू नगर भागातील ३ हजार स्केअर फूटच्या जागेवर बांधकाम केलेली जागा वापरासाठी दिली होती. मनपाने काही वर्षे याठिकाणी शाळादेखील सुरु केली होती. मात्र, कोरोनाच्या काळात ही शाळा बंद झाल्यानंतर एका खासगी संस्थेने काही महिन्यांपूर्वी चार खोल्यांचा अनधिकृतपणे ताबा घेऊन याठिकाणी धार्मिक शिक्षण देण्याचे काम सुरु केले होते. याबाबत मनपा प्रशासनाकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर बुधवारी उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या नेतृत्त्वाखाली मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक कारवाईसाठी पोहोचले. मात्र, कारवाईदरम्यान स्थानिकांनी विरोध केल्यामुळे याठिकाणी तणाव निर्माण झाला.
शेकडोंच्या जमावामुळे कारवाई थांबली
मनपाचे पथक दाखल झाल्यानंतर काही वेळातच त्याठिकाणी स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करायला सुरुवात केली. तसेच कारवाईला विरोध करत, चार खोल्या ताब्यात देण्यास विरोध केला. मात्र, मनपा अतिक्रमण निर्मूलन विभाग ही जागा ताब्यात घेण्यावर ठाम होता. त्यात नागरिकांची गर्दी वाढत गेल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे महापालिकेच्या पथकाने तब्बल दोन तास थांबून कारवाई काही काळ थांबवली होती.
गर्दी कमी होताच मनपाने चारही खोल्या केल्या सील
दुपारी तीन वाजल्यानंतर याठिकाणची गर्दी कमी झाल्यानंतर चारही खोल्यांना सील करून, या खोल्या ताब्यात घेतल्या आहेत. नगरपालिकेच्या काळात ही जागा आयडीयल फाऊंडेशनला वापरण्याबाबत ठराव केला असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले. मात्र, ही जागा खासगी असल्याने व तेव्हा करण्यात आलेला ठराव हा अशासकीय प्रस्ताव असल्याने या ठरावाची अंमलबजावणी करण्यात आलेली नसल्याने, ही जागा मनपाला ताब्यात घ्यावीच लागेल, असे मनपा प्रशासनाकडून सांगून, या चारही खोल्या मनपाने ताब्यात घेतल्या आहेत.