महिंदळे, ता. भडगाव : महिंदळे येथील शेतकरी राघो बुधा पाटील यांच्या मालकीच्या दोन एकर क्षेत्रातील कपाशीची चारशे ते पाचशे झाडे पूर्ण शेतात एकाच ठिकाणी न उपटता पूर्ण शेतात ठिकठिकाणी उपटली आहेत. सकाळी पिकाला पाणी देण्यासाठी त्यांचा मुलगा गेला असता हा प्रकार लक्षात आला. या माथेफिरूच्या कृत्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
अज्ञात व्यक्तीविरुद्ध भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही परिस्थिती पाहून शेतकऱ्याला रडू कोसळले.
परिसरात पावसाची सुरुवातच रिमझिम पावसाने झाली आहे. आजतागायत परिसरात दमदार पाऊस पडलेला नाही. शेतकऱ्यांनी विहिरींच्या तोडक्या पाण्यावर कपाशी पिके वाढवली आहेत. आतापर्यंत पिकांसाठी कर्ज काढून मोठा खर्च करत आहेत. त्यात पावसाने दडी मारल्याने पिके सुकण्याच्या मार्गांवर आहेत. या परिस्थितीत जेमतेम पिके तग धरून उभी असताना माथेफिरूने रात्री कपाशीची दोन एकर क्षेत्रातील ठिकठिकाणी चारशे ते पाचशे झाडे उपटून फेकली.
सकाळी शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी गेला असता हा प्रकार लक्षात आला. झाडे उपटून फेकलेली पाहून शेतकऱ्याला रडू कोसळले.
भडगाव तालुक्यात घडताहेत हे प्रकार वारंवार
तालुक्यात मागील आठवड्यात तांदुळवाडी येथेही असाच प्रकार झाला होता. तेथील शेतकऱ्याच्या शेतातील पूर्ण कपाशी पीकच उपटून फेकले व आता महिंदळे येथे शेतातील ठिकठिकाणी चारशे ते पाचशे झाडे उपटून फेकली. त्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. या माथेफिरूंचा बंदोबस्त व्हावा, अशी मागणी शेतकरीवर्गाकडून होत आहे.
120821\12jal_4_12082021_12.jpg
महिंदळे येथील शेतकऱ्याची उपटून फेकलेली कपाशी.