बालपणी गोदातार्इंमुळे साहित्याची गोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 01:22 AM2018-06-26T01:22:27+5:302018-06-26T01:22:59+5:30

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘माझी लेखन प्रेरणा’ या सदरात साहित्यिक सुषमा जयंत पाटील यांनी, आपल्याला बालपणी शाळेतील शिक्षिका गोदाताई पाटील यांच्यामुळे लिखाणाची, वाचनाची गोडी कशी लागली यासंबंधी सांगितलेल्या आठवणी.

Literature | बालपणी गोदातार्इंमुळे साहित्याची गोडी

बालपणी गोदातार्इंमुळे साहित्याची गोडी

Next

खरं तर प्रेरणा हा अंतस्त स्त्रोतच असतो. आपल्याही नकळत आपल्या आत खोलवर भिनलेला आणि पाझरत राहतो. कधी जगण्यातून, कधी वागण्यातून, कलेतून, सुरातून, गीतातून, लेखणीतून, तर कधी व्यक्तिमत्वाचा आणि जीवनशैलीचा एक लक्षणीय पैलू बनून. याच प्रेरणेला जेव्हा आपण प्रारूप देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मन:चक्षूवर उभा रहातो एक विविध अंगी कोलाज. घटना, व्यक्ती आणि संस्काराच्या विविध रंगछटा असलेला; जे आपल्या आत्मशोधाच्या वाटेवर आपली पाळंमुळं संबंधिताशी जोडलेली असल्याची वारंवार ग्वाही देतात.
अशीच एक व्यक्ती वर्गशिक्षिकेच्या रूपाने माझ्या बालमनावर काव्याचा चिरंतन ठसा उमटवून गेली. बुलढाणा जिल्ह्यातील सावरगाव नावाचं एक आदर्श गाव. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत माझ्या वर्गशिक्षिका असलेल्या गोदाताई पाटील. जिल्ह्यातल्या नामवंत कवयित्री. एक पाय पोलिओग्रस्त, अधू, पती जन्मताच मूकं, पदरात चार मुलं, जीवणाचा संघर्ष आणि खदखदणारी संवेदना बाईंनी कवितेत स्वाहा केलेली. एक नाटक व तीनचार काव्यसंग्रह प्रसिद्ध, ३५ वर्षांपूर्वी ग्रामीण भागातील स्त्रिसाठी हे एक मोठं दिव्यकर्मच, वाणीवर साक्षात सरस्वती आणि काळजात धगधगती उर्मी घेऊन बाई लिहित्या व्हायच्या शाळेतल्या मोकळ्या तासाला. त्यांच्या सृजनाचा पहिला श्रोता आणि साक्षीदार मी असायची. माझं वय आणि समज पाहता बाई माझ्याशी एक दहा ते अकरा वर्षाच्या मुलीशी कुठल्या जाणिवेतून संवाद साधायच्या माहीत नाही. कदाचित माझ्या घरची राजकीय, वैचारिक पार्श्वभूमी, वडील व्यासंगी राजकारणी, उत्तम वक्ते, घरात पुस्तकं आणली जायची, वाचली जायची या अनुषंगाने वर्गात प्रथम क्रमांक मिळविणारी मुलगी सूज्ञ आहे, असा बाईंचा विश्वास असावा.
गोदाताईंची प्रेरणा आणि घरातील वातावरणामुळे बालवयातच वाचनाची गोडी लागली. साने गुरुजी, बाबा भांड, ना.स.इनामदार, समग्र पु.ल. व अनेक आत्मचरित्र, चरित्र वाचून झाली. कवितेचं बिजारोपण तर झालेलं होतंच. लग्नानंतर चाळीसगावी ‘स्वांतसुखाय’ हा लेखन प्रांत मानून लिहीत राहिले. रोटरी क्लबशी जोडलेले असल्या कारणाने रोटरी बुलेटीनमध्ये कविता लिहित गेले.
‘लोकमत’ दिवाळी अंकासहीत इतरही मासिकांमध्ये कविता प्रकाशित झाल्या. चाळीसगाव म.सा.प.चे संस्थापक अध्यक्ष तानसेन जगताप यांच्या प्रेरणेने लवकरच काव्यसंग्रह प्रकाशित करण्याचा मानस आहे. आपल्यातील अंतस्थ
प्रेरणा जागृत ठेवून स्वत:ला व्यक्त होण्याच्या भावनेतून सतत प्रवाही असणं हा भाग साहित्यिक मूल्य जपण्याच्या हेतूने महत्वाचा मानते.

Web Title: Literature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.