जळगाव : कोरोनाच्या कारणामुळे मुदत संपलेले लर्निंग लायसन्स, फिटनेस प्रमाणपत्र, पासिंग यासह इतर कामांसाठी शासनाकडून ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. मात्र या मुदतीपर्यंतचा कोटा फुल्ल झालेला असून, अनेकांचे लायसन्स बाद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे, ही वेळ टाळण्यासाठी दररोजच्या कोट्यात वाढ करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी आरटीओ कार्यालयात जनतेला प्रवेश नाकारण्यात येत होता. या काळात ज्या वाहनधारकांचे विविध प्रकारच्या कागदपत्रांची मुदत संपत असेल किंवा लर्निंग लायसन्सधारकांना पक्के लायसन्स काढायचे असेल त्यांच्यासाठी केंद्र व राज्य सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत मुदत वाढविण्यात आली होती. आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने आरटीओ कार्यालयात नियमित कामकाज सुरू झालेले आहे. त्यामुळे एकाचवेळी काम वाढले आहे. अनेक लर्निंग लायसन्सधारकांना पक्के लायसन्स काढायचे आहे, मात्र त्यांना ३० सप्टेंबरपर्यंतची तारीख मिळतच नाही. आधीच या तारखेपर्यंत कोटा फुल्ल झालेला आहे. सरकारच्या नियमानुसार या तारखेच्या आत कामे करायची असल्याने स्थानिक पातळीवरच कोटा वाढवावा, जेणे करून वाहनधारक व लायसन्सधारकांना आर्थिक भुर्दंड बसणार नाही, अशी अपेक्षा अनेक जणांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
सुटीच्या दिवशी कार्यालय सुरू
नागरिकांची कामे थांबू नये, वेळेत व्हावी यासाठी शनिवार व रविवारी सुटीच्या दिवशीदेखील कार्यालय तसेच चाचणी केंद्र सुरू ठेवण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी दिली. लर्निंग लायसन्ससाठी मुदतीचा विषय नाही, कोणीही घरबसल्या ऑनलाइन लायसन्स काढू शकते. दरम्यान, बहुतांश जण तारीख दिल्यानंतर त्या तारखेवर येत नाहीत, तर दुसरीकडे जी व्यक्ती यायला तयार आहे, त्याला तारीख मिळत नाही अशी स्थिती सध्या निर्माण झालेली आहे.
कोट...
नागरिकांची कामे पटकन व्हावी यासाठी सुटीच्या दिवशी काम केले जात आहे. त्याशिवाय सात व दहा दिवसाची तारीख दिली जात आहे. ट्रक व इतर अवजड वाहनांच्या पासिंगसाठी रोजचा ५० ते ६० असा कोटा निश्चित करण्यात आला आहे. पक्के लायसन्सबाबत अजून तरी कोणाची तक्रार आलेली नाही. ३० सप्टेंबरपर्यंत सर्वांची कामे होतील.
- श्याम लोही, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी