जळगाव : गोळीबाराच्या गुन्ह्यात जामीनावर सुटल्यानंतर पुन्हा गावठी पिस्तूल हातात घेऊन वाल्मिक नगरात दहशत माजविणाऱ्या राकेश चंद्रकांत साळुंखे उर्फ लिंबू राक्या (वय २६,रा. कांचन नगर) याला शनी पेठ पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी अटक केली. त्याच्याकडून गावठी पिस्तूल हस्तगत करण्यात आला असून आर्म ॲक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, लिंबू राक्या हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुध्द यापूर्वी नऊ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांनी दिली.
शनी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही महिन्यापूर्वी दोन गटात वाद उफाळून आला होता. तेव्हा गोळीबाराची घटना घडली होती. या गुन्ह्यात लिंबू राक्या यालाही आरोपी करण्यात आले होते, त्यानेच गोळीबार केल्याचा आरोप होता. दरम्यान, या गुन्ह्यात त्याला अटक झाली होती,त्यात तो नुकताच जामीनावर सुटला आहे. गुरुवारी पुन्हा गावठी पिस्तूल हातात घेऊन तो कांचन नगरात दहशत माजवित असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांनी सहायक फौजदार संभाजी पाटील, परिष जाधव, प्रमोद पाटील, राहूल पाटील व शरद पाटील यांचे पथक रवाना केले. पोलिसांना पाहून लिंबू राक्या याने पळ काढला. मात्र पोलिसांनी पाठलाग करुन त्याला वाल्मिक नगरातील बगीच्याजवळ पकडलेच. कमरेत घातलेला पिस्तूल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आला. दरम्यान, त्याच्याविरुध्द शनी पेठ पोलिसात सहा, जिल्हा पेठ २, रामानंद व जळगाव शहर प्रत्येकी १ असे ९ गुन्हे यापूर्वी दाखल असून गुरुवारचा दहावा गुन्हा आहे. उपनिरीक्षक अमोल कवडे तपास करीत आहेत.